Pimpri News : भाजपा प्रवक्ते अमोल थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी; पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक!

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड संघटन सरचिटणीस तथा मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांच्यावर पक्षाने आणखी मोठी जबाबदारी दिली आहे. संघटन सरचिटणीस पदाबरोबरच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेचे समन्वयक म्हणून काम पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तीनही विधानसभेचे समन्वयक पदी नियुक्तीचे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सदाशिव खाडे हे पिंपरी विधानसभेचे प्रभारी, विजय फुगे हे भोसरी विधानसभेचे प्रभारी तसेच संतोष गुलाब कलाटे हे चिंचवड विधानसभेचे प्रभारी म्हणून यापूर्वीच नियुक्त झालेले आहेत. तर अमोल थोरात हे पिंपरी-चिंचवड जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस म्हणून काम पाहत आहेत.

आगामी काळात पिंपरी-चिंचवड जिल्हा संघटन सरचिटणीस पदाबरोबरच पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभांचा संपूर्ण व योग्य समन्वय साधण्यासाठी अमोल थोरात यांच्यावर ‘समन्वयक’ म्हणून अत्यंत महत्वाची जबाबदारी प्रदेश संघटनेने सोपविली आहे. आगामी महापालिका निवडणुका तसेच अन्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांची निवड करण्यात आली आहे. पक्षनिष्ठा, संघटनेतील कामाचा अनुभव लक्षात घेता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाने सोपवली आहे. संघ वर्तुळातील कार्यकर्त्याला महत्वाचे पद मिळाले आहे.

संघटनात्मक कार्याची घेतली दखल

अमोल थोरात यांनी भाजपा पिंपरी – चिंचवडचे सरचिटणीस, संघटन सरचिटणीस अशी महत्त्वाची जबाबदारी असतानाच शहरातील शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ यंत्रणा यासह संघटनात्मक बांधणीबाबत सक्रिय योगदान दिले आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी थोरात यांच्यावर मुख्य प्रवक्ता या पदाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच सोपावली होती. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तीनही विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.