Pimpri News : तयारी पूर्ण! पिंपरीत उद्यापासून हॉकीचा महामुकाबला

एमपीसी न्यूज – 11 वी हॉकी इंडिया वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा 2021 उद्यापासून (शनिवार, दि.11) सुरू होणार आहे. नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियमवर हि स्पर्धा पार पडणार आहे. उद्या सुरू होणा-या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिचवड महानगरपालिका महापौर उषा ढोरे, उपमहापौर हिराबाई घुले, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, यांनी आज (शुक्रवार, दि.10) मैदानाची पाहणी केली, व सर्व तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले.

मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडियमचा कायापालट करण्यासाठी पालिकेने कोट्यावधी रूपये खर्च केले आहेत. स्टेडियम साठी आंतरराष्ट्रीय दर्जाची ब्लू टर्फ, एलईडी लाईट, प्रेक्षक स्टॅड, अंतर्गत रस्ते आणि इतर स्थापत्य विषयक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठी स्पर्धा या मैदानावर खेळवली जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलीस आयुक्तालय आणि हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार, हॉकी महाराष्ट्राचा ब्रॅन्ड अँबेसडर पद्मश्री धनराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी तीन वाजता या स्पर्धेचे उद्धाटन होणार आहे.

देशातील विविध 30 राज्यातील 750 खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित राहणार असून, 40 पंच, 8 सिलेक्टर, 10 पदाधिकारी, 90 स्वयंसेवक स्पर्धेचे कामकाज पाहणार आहेत. एकूण 50 सामने होणार असून, दररोज सात सामने खेळवले. 18 डिसेंबर रोजी क्वार्टर फायनल तर, 21 डिसेंबर रोजी स्पर्धेचा अंतिम सामना होईल.

सुरक्षा व्यवस्था, पंच व खेळाडूंची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, कार्यक्रम नियोजन, पंच पदाधिकारी यांचे मानधन, प्रवास भत्ता, चषक, पदकं तसेच प्रसिद्धी व प्रेक्षेपण याचा खर्च हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.