Article by Dr. Rita Shetiya: लोकजागृतीचा फटाका!

एमपीसी न्यूज (डॉ. रिता शेटीया) – लोकजागृतीचा फटाका सगळीकडे पसरविणे आणि केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रदूषण मुक्त करणे. यावरच लोकजागर करणारा हा विशेष लेख…

भारतात सणासुदीला किंवा आनंद व्यक्त करताना फटाके फोडतात आणि दिवाळी आणि फटाके हे गणित ठरलेलेच आहे. त्यामुळेच सर्वात जास्त फटाके दिवाळीला फोडले जातात. हे फक्त भारतातच नाही तर जगभरात वेगवेगळ्या प्रसंगी फटाके फोडले जातात. 2022 मध्ये भारतात जवळपास 6000 कोटी रुपयांची उलाढाल फटाक्यांच्या व्यापारात झालेली दिसून आली . त्यात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. त्या पाठोपाठ उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातमध्ये झाली. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राने एकूण फटाक्यांच्या उत्पादनातील मोठा हिस्सा विकत घेतला होता. भारतात सुमारे 8 ते 10 लाख लोकांना या उद्योगातून रोजगार मिळतो. परंतु एकीकडे राष्ट्रीय उत्पनात भर आणि रोजगारनिर्मिती होत असली तरी दुसऱ्या बाजूने आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक परिणाम यामुळे होतात. विशेषतः श्वसनाचे आजार. यासाठी गरज आहे लोकजागृतीचा फटाका सगळीकडे पसरविणे आणि केवळ भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला प्रदूषण मुक्त करणे.

Pimpri : प्रदूषणाने ओलांडली धोकादायक पातळी;  बांधकामे आठ दिवस बंद, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी रोड वॉशर सिस्टीमद्वारे साफसफाई

फटाके हा दिवाळी उत्सवाचा एक अंगभूत भाग आहे आणि केवळ हिंदूच नाही तर इतर धर्माचे लोकही या सणात तितक्याच उत्साहाने सहभागी होतात. आता आरोग्य व पर्यावरणाला घातक असलेले फटाके वाजविणे बंद व्हावे, असा सूर ऐकायला येतो. मग हा योग्य आहे का? केवळ काही दिवस आणि काही तास फटाके फोडले जातात, असा दुसरीकडे सूर आहे ..आणि मग केवळ फटाक्यांनीच प्रदूषण होते का?

वर्षभर वाहने, विविध कारखाने, कोळश्यावर चालणारे विज प्रकल्प इत्यादींनी प्रदूषण होते त्याचे काय? तसेच बाजारात हिरवे फटाके देखील आहेत जे पर्यावरणाला हानी पोहचवत नाही, ज्यात रसायनांचे प्रमाण अत्यल्प असते. या बाजू पहिल्या तरी आपण प्रत्येकाने विचार केल्यास फटाक्यांनी वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसत आहे. दिवाळीच्या दिवशी आकाशात पहिले असता मोठ्या प्रमाणावर धुरांचे ढग निर्माण झालेले असतात. फटाके जळताना निर्माण होणार कार्बन, नायट्रोजन, सल्फर डायॉक्सिइड, ब्लॅक कार्बन यासारखे विषारी वायू निर्माण होतात. यामुळे डोळे, घसा , फुफ्फुस , हृदय आणि त्वचेवर विपरीत परिणाम होतो. धुळीचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे दमा, ऍलर्जिक ब्रॉकायटिसचा इतिहास असलेल्यांवर त्याचा गंभीर परिणाम होतो.

फटाक्याद्वारे सोडले जाणारे वायू सीओपीडी, आयएलडीसारख्या अंतर्निहित रोगांना चालना देतात. सोडलेल्या वायूंमुळे पूर्वीच्या निरोगी लोकांमध्ये गंभीर प्रतिक्रियात्मक वायुमार्ग डिसफंक्शन (RADS) होऊ शकते. जेव्हा फटाके बनविले जातात, तेव्हा फुटल्यानंतर रंगीबेरंगी दिसण्यासाठी त्यात किरणोत्सर्गी आणि विषारी पदार्थ वापरले जातात. जे हवा दूषित करतात. फटाक्यांमधील विविध रसायने आरोग्यासाठी घातक असतात.

त्यातील कॉपरमुळे श्वसन मार्गाची जळजळ होते. लिथियम आणि तांबे संयुगे हार्मोनल असंतुलनास कारणीभूत ठरतात. वनस्पती आणि प्राण्यांसाठी ते विषारी असतात. तसेच ते अर्भक आणि न जन्मलेल्या मुलांच्या शारीरिक, मानसिक वाढीसाठी देखील हानीकारक असतात. कॅडमियममुळे अशक्तपणा येतो आणि मूत्रपिंडाला नुकसान होते.

Pimple Gurav : फ… फटाक्याचा अन् प्र…प्रदूषणाचा पथनाट्यातून फटाकेमुक्त दिवाळीसाठी प्रबोधन

शिसे मज्जासंस्थेवर परिणाम करते. सोडियम त्वचेसाठी वाईट आहे. झिंकमुळे उलट्या होतात. ॲल्युमिनियम आणि अँटीमोनी सल्फाइड (रंगीत घटक) अल्झायमर रोगास कारणीभूत ठरतात. पँक्लोरेट (अमोनियम आणि पोटॅशियम) जे एक ऑक्सिडायझिंग एजंट आहेत त्यामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. यामुळे थायोराइड ग्रंथीना त्रास होतो. कडेनियम संयुगे फुप्फुसांना नुकसान करतात आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या निर्माण करतात.

बेरियम नायट्रेट विषारी आहे आणि त्यामुळे श्वासोच्छ्वासाची जळजळ, किरणोत्सर्ग प्रभाव गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या आणि स्नायू कमकुवत होतात. नायट्रेटमुळे मानसिक कमजोरी होऊ शकते. नायट्रेट जे या सर्वामध्ये सर्वांत प्राणघातक आहे. ते एखाद्याला कोमात पाठवू शकते. तसेच हे पण लक्षात घेतले पाहिजे की लहान मुलांवर फटाक्यांचा प्रभाव प्रौढांपेक्षा खूप जास्त होतो. कारण त्यांची संरक्षण यंत्रणा प्रौढांच्या मानाने कमजोर असते. नुकतेच पुणे महानगर पालिकेने सांगितले आहे की, पुण्यात श्वसनाचा त्रास होणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

दिवाळीच्या फटाक्यांमुळे निर्माण झालेल्या कचऱ्यामुळे देखील आरोग्यास हानी पोहचते. कारण हा कचरा जाळला असता यामध्ये मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे विषारी घटक असतात. एका संशोधनात असे दिसून आले की, वायू प्रदूषणामुळे साखरेची पातळी वाढते आणि मधुमेह रुग्णांमध्ये वाढ होते. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. नेहमीच्या फटाक्यांमुळे 160 डेसिबल तर ग्रीन फटाक्यांमुळे 110-125 परावृत्त डेसिबल आवाज निर्माण होतो. माणूस किती आवाज सहन करू शकतो? जागतिक आरोग्य संघटनेद्वारे अल्प कालावधीसाठी 120 डेसिबलपर्यंतचे ध्वनी सुरक्षित मानले जातात.

तरुणांपेक्षा वृद्ध आणि लहान बालके यांच्यावर याचा जास्त परिणाम होतो. यामुळे श्रवणशक्ती कमी झाल्याचे प्रकरणे पण समोर आलेली आहेत. केवळ मानवावरच नाही तर प्राण्यांवरही याचा हानीकारक परिणाम होतो. ताण , भीती आणि चिंता निर्माण होते. जळजळ आणि काही प्राण्यांना जखमा देखील होतात, असे संशोधनात दिसून आले.

आजपर्यंत पर्यावरणावर, नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि फटाक्यांमुळे होणारे अपघात जसे की, आग यामुळे देखील मालमत्तेची आणि जीवितांची हानी झालेली दिसून आली आहे. फटाके बनवणाऱ्या कामगारांना देखील बऱ्याच समस्या आणि आजारांना सामोरे जावे लागते.

Chikhali : बेकायदेशीरपणे फटाके बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

एकीकडे जागतिक तापमान वाढ आणि उत्सर्जन या समस्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. ऑक्टोबर मध्ये आपण ऑक्टोबर हिट पाहिली. एकंदरीत वायू आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी दरवर्षी जे उपाय योजले जातात ते शेवटी फटाके वाजवल्याने धुळीस मिळतात. त्यामुळे यावर पूर्णपणे बंदी लादल्याशिवाय दिवाळी ही पर्यावणपूरक होणार नाही, असा विचार वेगाने समोर येत आहे. यावर कधी बंदी घातली जाईल किंवा नाही, माहित नाही, पण आपण सर्व जण मिळून एक करू शकतो ते म्हणजे लोकांमध्ये विशेषतः लहान आणि तरुण पिढीमध्ये फटाक्यांचे दुष्परिणाम याबद्दल जणजागृती करणे आणि त्यांना फटाके वाजवण्यापासून परावृत्त करणे हे अधिक योग्य ठरेल.

कोरोना काळात कोरोनामुळे जसे तोटे झाले तसे एक चांगला परिणाम देखील झाला. त्याकाळात लॉकडाऊनमुळे आपण फटाके फोडले नाही आणि त्यावेळी प्रदूषण मुक्त दिवाळी आपण साजरी केली. कोरोनाने त्या वेळी आपणास ‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्’ म्हणजेच सर्व कर्तव्यांची पूर्ती करण्यासाठी शरीर हे एकमेव साधन आहे हे सर्वाना या जीवघेण्या विषाणूच्या निमित्ताने समजले. तसेच जिओ ओर जिने दो हा संदेश देणाऱ्या महावीर स्वामी यांनी देखील यातून हेच सांगितले आहे की, स्वतः जगा आणि इतरांनाही जगू द्या. आपल्या कृतीने इतरांना दुखावू नका.

कमी वेळेच्या आनंदासाठी कायमस्वरूपी दुःख, आजार ओढून घेऊ नका. त्यासाठी आपण सर्वानी एकत्र येऊन लोकजागृतीचा फटाका सगळीकडे पसरवूया आणि स्वतः आणि येणाऱ्या पिढीला पर्यावरण, पशू , प्राणी सगळ्यांचेच रक्षण करूया. यासाठी आपण स्वतःपासूनच सुरवात करूया!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.