T20 World Cup : ऑस्ट्रेलियाने रोखला पाकिस्तानचा विजयी रथ

मॅथ्यू वेडने केली अविस्मरणीय कामगिरी

एमपीसी न्यूज (विवेक दि. कुलकर्णी) : जवळपास कालच्याच सामन्याचे क्षणचित्रे बघत असल्याची अनुभूती देत मॅथ्यू वेड आणि मार्क्स स्टोयनिसने अविस्मरणीय खेळ करत पाकिस्तानच्या घशातला घास काढून घेत ऑस्ट्रेलिया संघाला पाकिस्तान विरुद्धची आपली विजयी कामगिरी अखंडित ठेवून विजय तर मिळवून दिलाच पण सोबत अंतीम सामन्याचे तिकीटही मिळवून दिले.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन तुल्यबळ संघातल्या आजच्या सामन्याकडे तमाम क्रिकेटरसिकांचे लक्ष्य लागून राहिले होते. पाकिस्तान या स्पर्धेत सर्वच्यासर्व सामने जिंकून आतापर्यंत अपराजित राहिलेला आहे. सोबत त्यानी युएई मध्ये लागोपाठ 16 सामने जिंकलेले, तर ऑस्ट्रेलिया 20/20 नॉक आऊटमध्ये पाकिस्तान कडून कधीही न हारल्याने आज काय फैसला  होणार याची उत्सुकता सगळ्यांना होतीच.

दुबईच्या मैदानावर झालेल्या आजच्या या उपांत्यफेरीच्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल कांगारूच्या बाजूने लागताच अरॉन फिंचने पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले. या स्पर्धेत जोरदार सलामी देणाऱ्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानच्या डावाची सुरुवात केली, तर मिशेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाचे आक्रमन सुरू केले. मागील काही वर्षांत पाकिस्तान संघाचे दौरे कमी झालेले. त्यात न्यूझीलंड आणि इंग्लंडने तर ऐनवेळेस दौरे रद्द करून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एकप्रकारे नामुष्कीच दिलेली.

या सर्व काळ्याकुट्ट बाजू विसरुन पाकिस्तानच्या तरुण कर्णधाराने संघाला एकजूट करून यास्पर्धेत जबरदस्त कामगिरी करून उपांत्य फेरीत पोहोचवले. त्याला विजयाचे मोल माहिती असल्याने त्याने नव्याजुन्या खेळाडूची मोट योग्यरित्या बांधून संघ एकजीव केला. राजकारणातले दोन कट्टर विरोधक एखादेवेळी एकत्र येवून एकमेकांची गोडवे गातील पण पाकिस्तान संघातली गटबाजी संपता संपत नाही,पण बाबर आझमने मात्र कमाल करत संघाची सर्वोत्तम कामगीरी करून घेत उपांत्यफेरीत स्थान मिळवले. समोर ऑस्ट्रेलिया सारखा झुंजार संघ असल्याने तुल्यबळ लढतीची अपेक्षा रसिकांना होती.

प्रथम फलंदाजीचा निर्णय स्विकारून आझम आणि रिझवानने आजही चांगली सलामी दिली. सातव्या षटकाअखेर त्यांनी अर्धशतकी भागीदारी नोंदवून ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचचा निर्णय चुकला असे वाटावे अशी फलंदाजी केली. अखेर ही जमलेली जोडी ऍडम झाम्पाने आझमला 39 या वैयक्तिक धावसंख्येवर वॉर्नरच्या हातून झेलबाद करून तोडली. आझमने 34 चेंडूत 39 धावा काढताना पाच चौकार मारले.

दुसऱ्या बाजूने रिझवानने मात्र आपला चांगला फॉर्म कायम ठेवत आपली आणखी एक अर्धशतकी खेळी पूर्ण केली. ही त्याची अकरावी आणि या स्पर्धेतली तिसरी अर्धशतकी खेळी होती. याचबरोबर त्याने एका वर्षात 1000 हुन अधिक धावा एका वर्षात करणारा पहिला फलंदाज हा बहुमानही पटकावला. त्याला फखर झमानने चांगली साथ दिली. या दोघांनी 50 चेंडूत 72 धावा जोडल्यानंतर अखेर रिझवानचा झंझावात शांत झाला.त्याने केवळ 52 चेंडूत घणाघाती 67 धावा काढताना तीन चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारले .तो स्टार्कच्या गोलंदाजीवर स्मिथच्या हातून झेलबाद झाला.

या स्पर्धेत आतापर्यंत फारसे न चाललेला फखर झमानने आज मात्र उपयुक्त फलंदाजी केली. त्याने केवळ 32 चेंडूत 52 धावा करताना तीन चौकार आणि चार षटकार मारले. यामुळेच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियापुढे 176 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले.

अंतीम फेरीत प्रवेश करण्यासाठी आणि पाकिस्तानला हरवण्यासाठी 177 धावांचे लक्ष्य घेवून ऑस्ट्रेलिया डावाची सुरुवात डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार फिंचने केली. पण डावाच्या तिसऱ्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीने कर्णधार फिंचला पायचीत करून संघाला स्वप्नवत सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणारा फिंच फलंदाजीत भोपळा पण फोडू शकला नाही. पण याने न डगमगता वॉर्नर आणि मिशेल मार्शने डाव सावरत 51 धावांची भागीदारीही केली.

चांगले खेळत असताना मार्शची 29 धावांची खेळी शादाब खानने संपवली. आणि अगदी थोड्याच वेळात त्याने स्टिव्ह स्मिथलाही बाद करून ऑस्ट्रेलिया संघाची अवस्था तीन बाद 77 अशी केली. मात्र या वावटळीतही वॉर्नर अगदी ठाम उभा होता खंबीरपणे पाय रोवून. यामुळेच ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स पडल्यावर सुद्धा पहिल्या दहा षटकात 89 धावा झाल्या होत्या. तर तितक्याच षटकात त्यांना अजून 88 धावा हव्या होत्या. काल त्यांच्या शेजारच्या देशाने ही अविस्मरणीय खेळ करत याहून अधिक धावा चोपल्या होत्या. यातून कांगारू काही प्रेरणा घेतील की पाकिस्तान त्यांचा खेळ खल्लास करणार याची उत्सुकता सर्वाना होतीच.

पण शादाब खानने अकराव्या षटकातल्या पहिल्याच चेंडूवर वॉर्नरची 49 धावांची खेळी संपवून ऑस्ट्रेलियाला चौथा मोठा धक्का दिला. यावेळी सामना बऱ्यापैकी पाकिस्तानच्या बाजूला झुकला होता.आणि शादाब खानने खतरनाक मॅक्सवेलला सुद्धा बाद करून सामन्यातला आपला चौथा गडी बाद करून यावर जवळपास शिक्कामोर्तबच केले. कारण यानंतर कांगारूला विजयासाठी 40 चेंडूत 73 धावा हव्या होत्या आणि त्यांचे सर्व खंदे फलंदाज तंबूत परतले होते. आता फक्त मॅथ्यू वेड आणि गोलंदाजच बाकी होते. त्यामुळे पाकिस्तानच्या गोटात आनंदी वातावरण होते.

मात्र 20/20 मध्ये कधीही खेळ बदलू शकतो, याची जाणीव ऑस्ट्रेलिया संघाला असल्याने त्यांनी नेहमीप्रमाणे आशा सोडली नव्हतीच. फक्त यावेळी वरच्या फळीतला फलंदाज हिरो नसला तर वेड आणि स्टोयनिस हे दोन जिद्दी फलंदाज मैदानावर होते. आणि अगदी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड सामन्यात झालेला चमत्कार याही सामन्यात झाला आणि मॅथ्यू वेडने निव्वळ वेड लागावी अशी फलंदाजी करताना फक्त 17 चेंडूत 41 धावा करताना स्टोयनिस सोबत 81 धावांची अभेद्य भागीदारी करताना ऑस्ट्रेलिया संघाला अंतिम फेरीचे तिकीट पक्के करून दिले. स्टोयनिसने 31 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या.

वेडने शाहीन आफ्रिदीच्या चौथ्या आणि सामन्याच्या 19 व्या षटकात तुफानी हल्ला चढवत तीन षटकार मारत एक षटक आणि पाच गडी राखून मोठा विजय मिळवून दिला. आता ते येत्या 14 तारखेला शेजारी राष्ट्र न्यूझीलंड सोबत विजेतेपदासाठी लढतील. ज्यातून क्रिकेट विश्वाला नवीन विजेता मिळेल. अविस्मरणीय खेळी करणारा मॅथ्यू वेड सामन्याचा मानकरी ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.