Pimpri News: कष्टकरी महिलांना दिवाळीनिमित्त बोनस द्या : बाबा कांबळे यांची मागणी

एमपीसी न्यूज – ऐन सणासुदीच्या काळामध्ये कष्टकरी महिलांवर आंदोलन करण्याची वेळ येत आहे. ते प्रशासनाचे अपयश असून महापालिका आयुक्त आणि त्यांचे प्रशासन नेमकं कोणासाठी काम करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे. दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या सणांमध्ये साफसफाई करणाऱ्या कामगारांना बोनस मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 1 हजार 600 सफाई कामगार महिलांना दिवाळीनिमित्त पगारा एवढा बोनस मिळावा. कामगार कायद्याप्रमाणे मिळणारे लाभ, पीएफ फंड या सुविधा मिळाव्यात. किमान वेतनप्रमाणे वेतन मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी सफाई काममगारांनी महापालिकेवर आंदोलन केले. यावेळी कांबळे बोलत होते.

कष्टकरी कामगार पंचायत कोषाध्यक्ष प्रल्हाद कांबळे, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष अनिता सावळे, मधुरा डांगे, सविता लोंढे, मंगल तायडे, रुक्मिणी कांबळे ,प्रमिला गजभार, मीना साळवे, जया धोत्रे, आदी यावेळी उपस्थित होते.

कांबळे म्हणाले की, महानगरपालिकेने साफसफाई कामाचा नवीन ठेका दिला आहे. यामध्ये आता कामगारांना कमी करण्याची व त्यांना चार तास मानधनावर काम करण्यास सांगितले जात आहे. नवीन ठेकेदारी पद्धतीमध्ये कामगार कायद्याचा भंग होत आहे. नवीन ठेकेदारांना काम देण्याबाबत पुनर्विचार करून साफ सफाई कामगारांना कायम करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.