ST Workers Strike : संप मागे ; एसटी पुन्हा मार्गावर

एमपीसी न्यूज : आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे काही दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेतला आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मागण्या मान्य झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने उपोषण मागे घेतले आहे.

कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी कृतीसमितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत मंत्री ॲड. अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले. तर उर्वरीत मागण्यांबाबत दिवाळीनंतर निर्णय घेणार असल्याचं सांगितलं.

या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे, कर्मचारी व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापक माधव काळे, वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव, मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे, आणि हनुमंत ताटे यांच्याबरोबरच महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे (इंटक) मुकेश तिगोटे, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर, कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटनेचे सुनील निरभवणे, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे, महाएसटी कामगार काँग्रेसचे (इंटक) दादाराव डोंगरे या कामगार नेत्यांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.