Kalewadi News: डेंग्यू, चिकनगुणिया, मलेरियाविरोधात प्रभावी उपाययोजना आखा : मच्छिन्द्र तापकीर

एमपीसी न्यूज – कोरोनापाठोपाठ डेंग्यू, चिकनगुनिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दाट लोकवस्तीच्या रहाटणी, तापकीरनगर, ज्योतीबानगर, श्रीनगर या भागात डेंग्यू, चिकनगुणिया आणि मलेरियाची लागण मोठ्या प्रमाणावर होत आहे. डासांची उत्पत्ती स्थान नष्ट करणे आणि डासांपासून बचाव करण्यासाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. त्यात,मच्छिंद्र तापकीर यांनी म्हटले आहे की,कोरोनापाठोपाठ शहरात डेंग्यू,चिकनगुनिया, मलेरिया या साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. महिन्यापासून रहाटणी, तापकीरनगर, ज्योतीबानगर, श्रीनगर या भागात किटकजन्य साथीच्या आजारांचा उद्रेक झाला आहे. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया अशा साथीच्या आजाराचा फैलाव गतीने होत आहे. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिक त्रस्त आहेत.

स्मार्ट सिटीच्या नावाखाली या परिसरात रस्ते खोदले आहेत. कामे अर्धवट अवस्थेत आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव, नवरात्री, दसरा उलटून सर्वत्र दिवाळीचा माहौल आहे. मात्र, महापालिकेच्या गलथान कारभारामुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेच्या दिरंगाईचा फटका नागरिकांच्या आरोग्यास होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जनजागृती करत आहोत. जास्त दिवस पाण्याची साठवणूक करू नये, घर आणि परिसरातील डासांची उत्पत्तीस्थान नष्ट करावेत, डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानीचा वापर करावा, अशी जागृती केली जात आहे. पण रहाटणी, तापकीरनगर, ज्योतिबानगर, श्रीनगर या भागात पाणी साठून राहण्याचे आणि दलदलीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.

गटारांचीही नियमित स्वच्छता न झाल्याने डास कमी होत नसल्याचे चित्र आहे. घरात साठवून ठेवलेल्या पाण्यात आणि घराशेजारी असलेल्या दुचाकी, चारचाकीचे टायर, प्लॉस्टिक, पत्र्याच्या डब्यात साठलेल्या पावसाच्या पाण्यात डास तयार होत आहेत. यामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. याकडे महापालिकेने गांभिर्याने पाहावे.हिवताप, डेंग्यू, चिकनगुनियासारखे किटकजन्य साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी वेळीच खबरदारी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीस आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात. अन्यथा ऐन दिवाळीत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागले, असा इशारा मच्छिंद्र तापकीर यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.