Bhosari : सोशल मिडियामुळे पाच दिवसांपासून भरकटलेले आजोबा परतले घरी

एमपीसी न्यूज – उपचारासाठी (Bhosari) पिंपरी-चिंचवड शहरात आलेले 76 वर्षीय आजोबा भरकटले. हे आजोबा सोशल मिडियामुळे घरी परतले. भोसरी येथील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आजोबांची माहिती सोशल मिडीयावर पाठवून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला.

प्रकाश पोपटलाल शहा (वय 76, रा. लोणी धामणी, ता. शिरूर, जि. पुणे) असे त्या आजोबांचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, भोसरी येथील उड्डाणपुलाखाली मागील पाच दिवसांपासून एक वृद्ध आजोबा बसले होते. ते कुणाकडे काही मागत नव्हते आणि कुणी काही दिले तर घेतही नव्हते.

अगदी खाण्यापिण्याची वस्तू देखील ते अनोळखी माणसाकडून घेत (Bhosari) नव्हते. हा प्रकार राहुल रानेर यांच्या निदर्शनास आला. राहुल यांनी आजोबांच्या जवळ जाऊन आजूबाजूला पाहणी केली.

तिथे त्यांना एक आधारकार्ड सापडले. त्यावरील फोटो आजोबांच्या चेहऱ्याशी जुळत असल्याने त्याची माहिती राहुल यांनी सोशल मिडियावरून श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे धीरज झोडगे यांना दिली.

धीरज झोडगे यांनी ही माहिती सोशल मिडियावरून त्यांचे मामा देविदास गिरमे यांना दिली. आधार कार्डवर पूर्ण पत्ता नव्हता, केवळ लोणी एवढेच गाव होते.

त्यामुळे आजोबांचा पत्ता शोधणे कठीण होते. गिरमे यांनी त्यावरील पिन कोड वरून गावाचे नाव शोधले. त्यांचे गाव शिरूर तालुक्यातील लोणी धामणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गिरमे यांनी त्या परिसरातील कान्हूर मेसाई येथील त्यांचे मित्र दादा बोऱ्हाडे यांना सोशल मिडियावरून ही माहिती दिली.

Alandi : भाद्रपद बैल पोळ्या निमित्त मातीची बैल व शारदीय नवरात्रारंभ निमित्त घटस्थापनेच्या वस्तू बाजारपेठेत

बोऱ्हाडे यांनी लोणी धामणी येथील सोशल मिडिया ग्रुपवर ही माहिती (Bhosari) टाकताच काही मिनिटांमध्ये आजोबांच्या मुलाचा देविदास गिरमे यांना फोन आला. आजोबांची मुले भोसरी येथे आली आणि आजोबांना सोबत घेऊन गेली.

तब्बल पाच दिवस आजोबांनी अन्नाचा कण देखील खाल्ला नव्हता. त्यांच्या नात्यातील एकजण आले आणि त्यांच्या हातून त्यांनी दोन-तीन काजू खाल्ले.

त्यानंतर शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांची भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात ट्रीटमेंट सुरु होती. त्यामुळे ते नेहमी एकटे भोसरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी येत असत. असेच ते यावेळी देखील आले होते.

येताना काही पैसे, मोबाईल फोन आणि हॉस्पिटलशी संबंधित कागदपत्रे घेऊन ते आले होते. मात्र भोसरी येथे आल्यानंतर ते भरकटले आणि पुलाखाली बसले.

दरम्यान, चोरट्यांनी शहा यांचा मोबाईल फोन चोरून नेला. तो मोबाईल फोन पोलिसांनी ट्रेस केला. मात्र केएसबी चौकापर्यंत मोबाईलचे लोकेशन आले. त्यानंतर मोबाईल बंद झाला. त्यांच्याकडील पैसेही काढून घेण्यात आले होते.

हॉस्पिटलशी संबंधित कागदपत्रे असलेली पिशवी देखील त्यांच्याजवळ नव्हती. सुदैवाने केवळ आधार कार्ड त्यांच्या आजूबाजूला पडलेले होते. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेता आला.

श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाचे उत्सव प्रमुख देविदास नामदेव गिरमे, मंडळाचे सर्व सभासद, चाळीशीचा उंबरठा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचे सहकारी यांनी आजोबांना त्यांच्या नातेवाईकांच्या सुखरूपपणे ताब्यात दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.