Bhosri MIDC : कंपनीमध्ये लागलेली आग अखेर दोन तासाने विझवण्यात यश

एमपीसी न्यूज : भोसरी एमआयडीसी (Bhosri MIDC) परिसरातील एका कंपनीमध्ये लागलेली भीषण आग 10 अग्निशमन बंबांनी दोन तासात विझवली. ही आग टी ब्लॉकमधील चिंतामणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन या कंपनीमध्ये सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लागली होती. जेव्हा ही आग लागली तेव्हा सुरुवातीस कमी प्रमाणात होती. परंतु, अचानक या आगीने रौद्र रूप घेतले. ही आग मोठी होऊन काळ्या धुराचे लोट बाहेर येऊ लागले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे उप अधिकारी प्रताप चव्हाण म्हणाले, की सव्वा अकरा वाजता पाटोळे नावाच्या नागरिकाने आग लागल्याचे कळवले. पिंपरी कार्यालयाचे दोन बंब तर भोसरी, तळवडे, थेरगाव, प्राधिकरण कार्यालयांचे प्रत्येकी एक बंब घटनास्थळी पोहोचले होते. तसेच, चाकण एमआयडीसी व पीएमआरडीएचे प्रत्येकी एक बंब देखील घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी एका तासात आग आटोक्यात आणली. दोन तासात आग विझवण्यात आली व कूलिंग ऑपेरेशनही पूर्ण करण्यात आले.

या कंपनीमध्ये फॉम, फॉमला (Bhosri MIDC) चिकटवण्यासाठी लागणारे रसायन व ऑइल होते. ऑइल 200 लिटरच्या ड्रममध्ये साठवून ठेवले होते. अंदाजे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.

Bhosari MIDC : भोसरी एमआयडीसीतील टी ब्लॉकमध्ये आग

फोरम फॉर स्मॉल इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर म्हणाले, की भोसरी एमआयडीसी परिसरात केमिकल, इंजिनिअरिंग, मेडिकल व इतर प्रकारच्या कंपनी आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये 100 हून अधिक कामगार काम करतात. लवकर अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले नाही, तर ती आग शेजारील 3 ते 4 कंपनीमध्ये पसरते.

 

 

 

 

 

 

 

यामुळे लाखो ते करोडो रुपयांचे नुकसान होते. कोणत्याही कंपनीमध्ये आग लागली, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पिंपरी, प्राधिकरणसारख्या लांबच्या कार्यालायचे बंब येतात. तसेच, चाकण एमआयडीसीचाही अग्निशमन बंब मदतीसाठी येतो. त्यामुळे भोसरी एमआयडीसीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र बनवावे अशी आमची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.