Bhosari : ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’मुळे भोसरीतील वाहतूककोंडी, पार्किंगचा प्रश्न सुटणार; भोसरीमधील स्थानिकांना विश्वास

एमपीसी न्यूज – भोसरीमधील वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासठी ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ तयार करण्यात आले आहे. यानुसार भोसरी उड्डाणपुलाखाली आधुनिक पार्किंग आणि पदपथ तयार करण्यात येणार आहेत. वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार आहे, असा विश्वास भोसरी मतदारसंघातील स्थानिक नागरिकांना व्यक्त केला आहे.

महापालिका क्षेत्रात पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीत मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याने महापालिकेमार्फत या रस्त्यास शितलबाग ते धावडेवस्ती पर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. पुलामुळे वाहतूककोंडी सुटेल अशी अपेक्षा होती. तथापि, भोसरी गावठाणातील वाहतूक सेवेचा थांबा, आळंदीकडे, दिघीकडे जाणारा रस्ता, विविध व्यावसायिक, एसटी बसचा थांबा, खासगी वाहने यामुळे पुलाखालील वाहतूक कोंडी कमी झाली नाही.

_MPC_DIR_MPU_II

पुलाखालील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिका-यांना दिले होते. त्यानुसार आता या भागातील पादचा-यांचा, नागरिकांच्या सोईच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहेत. विदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर भोसरी उड्डाण पुलाखालील वाहतुकीचे ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन’ संकल्पनेअंतर्गत नियोजन केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, गार्डन, ई- टॉयलेट आदी प्रकल्प हाती घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पदपथ समपातळीत व विनाअडथळा असल्याने शहरातील सर्व घटकांसाठी सुरक्षित आहे. विशेषत लहान मुले, दिव्यांग व वयोवृद्धांसाठी सुरक्षित आहे. नागरिकांसाठी सार्वजनिक बैठक व्यवस्था असल्याने या भागात आनंदमयी वातावरण राहणार आहे. वाहन व्यवस्था, स्थानिक व शहराशी जोडणारी सुलभ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या मार्गावर आहे. या सुलभ वाहतूक व्यवस्थेमुळे वायू, ध्वनी प्रदूषण अत्यंत कमी होणार आहे.

श्रीकृष्ण साठे म्हणाले, “भोसरी परिसरात महिला काही वर्षांपासून अनेक विकासकामे सुरू आहेत. भोसरीमध्ये कायम रस्त्यावर गर्दी पाहायला मिळते. पुणे नाशिक महामार्ग भोसरीमधून जातो. तसेच आळंदी आणि काही भागात जाण्यासाठी भोसरी हाच पर्याय आहे. त्यामुळे इथे गर्दी असते. पदपथावर झालेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना भर रस्त्यावरून चालावे लागते. यासाठी तोडगा काढत आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मधील मुख्य पुलाखाली अर्बन स्ट्रीट बनविण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे पार्किंग आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांना यापूर्वी या मार्गावर अपघाताला सामोरे जावे लागले आहे. ‘अर्बन स्ट्रीट’मुळे त्यातून सुटका मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.