Bhosari : भोसरीत मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात; जिल्हाधिका-यांकडून गायरान जमीन महापालिकडे हस्तांतरित

समाविष्ट गावात होणार विकासकामांचा धडाका

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्ट गावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली आहे. आमदार महेश लांडगे यांनी दिघी, तळवडे, चिखली, मोशी परिसरातील तब्बल 15 ठिकाणच्या गायरान जमिनी विकसित करण्याचा अजेंडा हाती घेतला आहे. त्यापैकी एकूण 5 जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागेत शाळा, उद्यान, पोलीस ठाणे, अग्निशामक केंद्र, रुग्णालये, पाण्याची टाकी उभारण्यात चा मार्ग मोकळा झाला आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. जागा महापालिकेकडे हस्तांतरित झाली नसल्याने समाविष्ट गावातील विकासकामांना खीळ बसली होती. निधी असूनही केवळ जागे अभावी अनेक विकासकामे रखडली होती. गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार त्यांनी पाठपुरावा सुरु केला. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला, बैठका घेतल्या. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देखील पाठपुरावा केला.

गायरान जमिनींच्या प्रश्नासंदर्भात विधानसभा अधिवेशनात आमदार लांडगे यांनी चार वेळा लक्षवेधी मांडली. जमीन हस्तांतरित करण्याची किचकट प्रक्रिया आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पार पडली आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनामध्ये यशस्वी समन्वय करण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी भोसरी मतदारसंघातील गायरान जागा पिंपरी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता भोसरी मतदारसंघातील समाविष्ट गावात विविध विकास कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोशी येथील नागरिक किशोर बो-हाडे म्हणाले, भोसरी विधानसभा मतदारसंघातील काही गावांचा पिंपरी चिंचवड महापालिकेत समावेश झाला. पण त्या गावांच्या गायरान जमिनी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात अनेक जाचक प्रक्रियेतून जावे लागणार होते. आमदार महेश लांडगे यांनी त्या जमिनी महापालिकेला मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा केला. गायरान जमिनी महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे या जमिनींवर विविध विकासकामे करण्यास लवकरच सुरुवात होईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like