Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यतीला न्यायालयातून हिरवा कंदील मिळेल अशी आशा

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यतीबाबत आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा करून विधानसभेत लक्षवेधी मांडून याबाबतचा कायदा तयार करून घेतला. मात्र, काही प्राणीमित्र संघटनांच्या भूमिकेमुळे हे प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयातून हा विषय सुटेल आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीची आरोळी महाराष्ट्रभर घुमेल, अशी आशा बैलगाडा मालक केतन जोरे यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी केतन जोरे म्हणाले, बैलगाडा शर्यतीचा विषय मागील 12 वर्षांपासून चर्चेत आहे. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी करू, बघू, होईल अशी आश्वासने देऊन शेतक-यांची फसवणूक केली. बैलगाडा शर्यत हा शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. बैलगाडा शर्यतीवर काही प्राणीमित्र संघटनांनी बंदी घातली. यामुळे शेतकरी आणि बैलगाडा मालकांना निराशा आली. अनेक आंदोलने केली. पण, हाती काहीच लागेना. शेतक-यांना हा विषय मार्गी लावून बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी एका नेतृत्वाची गरज होती. अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक संघटनेच्या सर्व पदाधिका-यांनी, शेतकरी आणि बैलगाडा शर्यत प्रेमींनी मिळून आमदार महेश लांडगे यांच्याकडे याचे नेतृत्व देण्याचे ठरवले. त्यांची भेट घेतली आणि हा प्रश्न त्यांना सांगितला. त्यावर आमदार लांडगे यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आणि तात्काळ कार्यवाही देखील चालू केली.

आमदार महेश लांडगे यांनी याप्रकरणी बैलगाडा मालकांचा एक मोर्चा बैलगाड्यासह विधानभवनावर नेला. बैलगाडा शर्यत आणि अन्य प्रकारच्या हरकतींबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यामध्ये बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत कायदा करण्यात आला. राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहांची त्याला मंजुरी देखील मिळाली. मात्र, पुन्हा एकदा प्राणीमित्र संघटनांनी ‘खोडा’ घालून हा विषय न्यायालयात नेला. कायदा बनून देखील केवळ प्राणिमात्रांमुळे हा विषय न्यायालयात गेला आहे.

याप्रकरणी बैलगाडा मालकांची बाजू मांडण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने तज्ज्ञ वकीलांची नेमणूक करण्यात आली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळे राज्य शासन आज बैलगाडा मालकांच्या मागे उभे आहे. पुढील काळात न्यायालयातून बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबत हिरवा कंदील मिळेल आणि पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु होईल, अशी आशा आहे. महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली हा विषय तडीस लागेल, असेही केतन म्हणाले.

बैलगाडा मालक शैलेश कदम म्हणाले, 2008 पासून बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठीचा लढा सुरु आहे. 2014 पर्यंत यासाठी कोणीही आवाज उठवला नाही. बैलगाडा मालकांनी व शेतक-यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण, त्या सर्वांच्या तोंडाला आश्वासनांची पाने पुसण्यात आली. आमदार महेश लांडगे यांनी याबाबत निर्णायक भूमिका घेत बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. पुढील काळात त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु होईल, अशी आशा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.