BJP : भाजप शहराध्यक्षाची नियुक्ती रखडली, कोणाला मिळणार संधी?

एमपीसी न्यूज – केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष (BJP) पूर्ण झाल्यानिमित्त भाजपकडून राबविण्यात येत असलेल्या ‘मोदी @9’ या देशव्यापी मोहिमेमुळे पिंपरी-चिंचवड भाजप शहराध्यक्षपदाची नियुक्ती रखडली. महापालिका निवडणूक होईपर्यंत विद्यमान शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांना मुदतवाढ दिली जाते की चिंचवडच्या शंकर जगताप यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे 16 जानेवारी 2020 रोजी भाजपच्या शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. त्यांचा शहराध्यक्षपदाचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपून सात महिने पूर्ण झाले. त्यामुळे भाजपमध्ये शहराध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरु झाली होती.

भाजपचे पिंपरी-चिंचवड निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. त्यांनी पक्षाचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शहराध्यक्ष निवडीबाबतच्या भावना जाणून घेतल्या. हा आढावा अहवाल प्रदेशाध्यक्षांना सादरही केला आहे. मात्र, नियुक्ती जाहीर झाली नाही.

भाजपची राज्य कार्यकारिणी 5 मे रोजी जाहीर झाल्यानंतर (BJP) राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष 15 मे आणि नंतर 20 मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नाहीत. पुन्हा ‘मोदी @9’ या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला आहे.

PMPML : पीएमपीएमएलच्या बेशिस्त वाहक व चालकांची तक्रार करा व बक्षिस मिळवा

त्यापूर्वी शहराध्यक्षांची नियुक्ती केली तर, त्यांची कार्यकारिणी तयार होण्यास वेळ जाईल. परिणामी, या मोहिमेला अडथळा निर्माण होईल. त्यातून या नियुक्त्या लांबणीवर पडल्याचे सांगितले गेले होते. आता ही मोहिम संपली तरी नियुक्ती रखडली आहे.

शहराध्यक्ष निवडीवरुन भाजपमध्ये दोन गट –

महापालिका निवडणुकीपूर्वी शहराध्यक्ष बदल करायचा की नको? यावर शहर भाजपमध्ये दोन मतप्रवाह आहेत. पक्षाच्या घटनेनुसार दुसऱ्यावेळी संधी न देता बदल करावा असा एक आणि महापालिका निवडणूक होईपर्यंत महेश लांडगे यांनाच शहराध्यक्षपदी कायम ठेवावे असा दुसरा मतप्रवाह आहे. त्यामुळे शहराध्यक्ष बदलणार की लांडगे महापालिका निवडणूक होईपर्यंत लांडगे यांनाच मुदतवाढ मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य आहे.

शंकर जगताप यांच्यासाठी एक गट आग्रही

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रबळ दावेदार असतानाही शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी दिली. त्यामुळे शंकर यांच्यावर अन्याय झाला आहे.

शंकर यांच्यात शहर भाजपचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. शहराध्यक्षपद देवून पोटनिवडणुकीत त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी एका गटाची मागणी आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यातून कसा तोडगा काढतात. लांडगे यांनाच कायम ठेवतात की जगताप यांच्या खाद्यांवर शहराध्यक्षपदाची जबाबदारी टाकतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.