ICC News : भारताची दमदार सुरुवात; विंडीजचा डाव गडगडला

एमपीसी न्यूज : (विवेक कुलकर्णी)जागतिक क्रिकेटमध्ये (ICC News) कधीकाळी अनभिषिक्त सम्राट असलेल्या पण, आज मात्र एकदम तळाशी असलेल्या दुबळ्या वेस्ट इंडीज विरुद्ध भारतीय संघाने अपेक्षित अशी शानदार सुरुवात करताना यजमान संघाचा डाव केवळ 150 धावात गुंडाळून टाकला आणि त्यानंतर आजच्या उर्वरित खेळात शानदार सुरुवात करताना नाबाद 80 धावा केल्या आहेत.

जागतिक कसोटी विश्व स्पर्धेच्या अंतिम सामन्यात उपविजेता ठरलेल्या भारतीय संघाने ते अपयश विसरून आजपासून सुरू झालेलं वेस्ट इंडीज विरुद्धच्या दोन कसोटी मालिकेच्या सामन्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात अपेक्षित अशीच सुरुवात करून सामन्यच्या पहिल्याच दिवशी चांगले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

विंडसर पार्क डॉमीनीका येथे सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला असला तरी त्यानंतर मात्र त्याने सामन्यात सर्वच आघाडीवर शानदार खेळ करून उत्तम सुरुवात केली आहे. आज भारतीय संघाने युवा यशस्वी जैस्वाल आणि ईशान किशन या दोन प्रतिभावंत खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी दिली.

विंडीज संघाचा कर्णधार ब्रेथवेट याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण अगदी थोड्याच वेळात त्याचा निर्णय भारतीय संघांने चुकीचा ठरवला. कर्णधार ब्रेथवेट आणि चंद्रपॉल यांनी विंडीजच्या डावाची बऱ्यापैकी सुरुवात केली होती खरी, पण रवीचंद्रन अश्विनने गोलंदाजीला येताच आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली.

त्याने चंद्रपॉलला बाद करून कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाच्या बापलेकाला बाद करून अनोखा विक्रम साधला, अशी कामगिरी करणारा तो पहिलाचा भारतीय गोलंदाज ठरला. यानंतर विंडीज संघाच्या विके ठराविक अंतराने पडायला सुरुवात झाली. उपहारालाच त्यांची अवस्था 4 बाद 68 अशी झाली अन पुढे काय होणार याचा अंदाज यायला सुरुवात झाली.

अश्विनने आजच्या तिसऱ्या विकेट्स सह आंतरराष्ट्रीय सामन्यात आपली 700 बिकेट्स पुर्ण करत मोठा किर्तीमान हासिल केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज आहे. या यादी 900 बळी मिळवणारा अनिल कुंबळे प्रथम क्रमांक तर 711 बळी मिळणारा हरभजन द्वितीय स्थानी आहे. याचबरोबर त्याने या सामन्यात 60 धावा देत 5 बळी मिळवताना 33 वेळा सामन्यातल्या एका डावात 5 वा त्याहून अधिक बळी मिळवण्याचा मोठा पराक्रमही केला आहे.

त्याला शुभमन गीलनेही एक अप्रतिम झेल घेत हा पराक्रम पूर्ण करण्यात मोठीच मदत केली आहे. त्याने अखेरच्या फलंदाजाचा अप्रतिम झेल घेतला आणि अश्विनच्या नावावर 33 वेळा 5 बळी मिळवण्याची आणखी एक कामगिरी जमा झाली. त्याला जडेजानेही चांगली साथ दिल्याने विंडीज संघाचा डाव केवळ 150धावातच गारद झाला.

या खतरनाक गोलंदाजीमुळे 2019 पासून सामन्याच्या पहिल्याच दिवशी विपक्षी संघाच्या दहा विकेट्स मिळवत भारतीय संघाने या यादीत आपला क्रमांक द्वितीय स्थानी आणला. पहिल्या क्रमांकावर इंग्लंड आहे, त्यांनी अशी कामगिरी 11 वेळा केली आहे. तर आजच्या या पराक्रमासह भारतीय संघाने अशी कामगिरी (ICC News) दहाव्यांदा केली आहे.

विंडीज संघाकडून फक्त पदार्पण करणाऱ्या एलीक अथानजे याने लढायची जिद्द दाखवली. त्याला दुसऱ्या बाज मात्र म्हणावी तशी चांगली साथ मिळाली नाही. ब्रेथवेटने 20, होल्डर 18 तर कॉर्नवेलने नाबाद 19 धावा केल्या, तर अथानजेने 47 धावांची झुंजार खेळी केली.

यानंतर आजच्या उर्वरित खेळात भारतीय संघाने युवा यशस्वी जैस्वालला कर्णधार रोहित सोबत सलामीला पाठवून नवीन जोडी खेळवली. एका सामान्य कुटुंबातील यशस्वी जैस्वालची संघर्षकथा खरोखरच अनेकांसाठी प्रेरक आहे. पाणीपुरीचा व्यवसाय करणाऱ्या त्याच्या वडिलांनी यशस्वीच्या आवडीचा आणि मताचा स्वीकार करून असंख्य अडचणीवर मात करत त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले.

त्याचेच फळ आज त्यांना मिळाले. नुकताच झालेल्या आयपीएल हंगाम गाजवून सर्वाना प्रभावित करणाऱ्या यशस्वी जैस्वालला भारतीय संघानेही योग्य वेळी संधी दिली, अन त्याने ती आजचा खेळ समाप्त होईस्तोवर साध्य केल्याने भारतीय संघाला उत्तम सलामी तर मिळालीच पण या सामन्यात मोठ्या धावसंख्येकडे जाण्यासाठी योग्य ती पायाभरणीही मिळाली.

त्याने शानदार खेळ करत नाबाद 40 धावा करून आपल्या आगमनाची वर्दी क्रिकेट जगताला दिली आहे. रोहितनेही त्याला स्ट्राईक देत त्याच्या प्रतिभेवर विश्वास ठेवला आणि त्याचा आत्मविश्वास द्विगुणित केला. यशस्वीने 73 चेंडूत चौकार मारत नाबाद 40 धावा केल्या तर रोहीतनेही त्याला उत्तम साथ देताना नाबाद 30 धावा (ICC News) केल्या.

ज्यामुळे भारतीय संघाने आजच्या दिवसावर संपूर्ण वर्चस्व गाजवले. उद्या या धावसंख्येत अधिकाधिक भर घालून भारतीय संघ विंडीजला खिंडीत गाठेल असे आता तरी खात्रीपूर्वक म्हणावे वाटते. क्रिकेट हा कितीही अनिश्चिततेचा खेळ आहे हे माहीत असले तरीही यशस्वी जैस्वाल आणि रोहित उद्याही अशाच पद्धतीने खेळून आपल्या वैयक्तिक शतकांना गाठतील का हे बघणे औत्सुक्यपूर्ण असेल, नाही का?

 

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज
पहिला डाव
सर्वबाद 150
ब्रेथवेट 20,होल्डर 18,अथानजे 47,कॉर्नवेल नाबाद 19
अश्विन 60/5,जडेजा 27/3,ठाकूर 15 /1
भारत
पहिला डाव
बिनबाद 80
जैस्वाल नाबाद 40,रोहित नाबाद 30

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.