Pune : शहरातील खड्डे, कचरा, पुरेसे पाणी न मिळाल्याने भाजप उमेदवारांचा पराभव

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे, कचरा, धरणांत 97 टक्के पाणीसाठा असतानाही दोन वेळ पुणेकरांना चांगला पाणीसाठा न देणाऱ्या पुणे महापालिकेच्या प्रशासनामुळे भाजप उमेदवारांना वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांत पराभव स्वीकारावा लागला. तर, खडकवासला मतदारसंघात केवळ 2500 मतांनी भिमराव तापकीर यांचा विजय झाला. सत्ता राबविण्यात महापालिका पदाधिकाऱ्यांनाही अपयश आल्याची चर्चा भाजपच्या बैठकीत करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या पदाधिकाऱ्यांना सुनावले. त्याचा राग आता नगरसेवक प्रशासनावर काढत आहेत.
एकट्या कसबा मतदारसंघात महापौर मुक्ता टिळक यांचा 28 हजार मतांनी विजय झाला. भाजपच्या शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांच्या मताधिक्यात कमालीची घट झाली आहे. कोथरूडमध्ये मेट्रोचे काम सुरू आहे. सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी असते. तासनतास कोथरूडकरांना वाहतूक कोंडीत घालावे लागते. शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांतही भाजपचे उमेदवार केवळ 5 – 5 हजार मतांनी विजयी झाले. यावेळी विधानसभा निवडणुकीत नगरसेवक मोठ्या संख्येने उभे होते. पुणे महापालिका निवडणुकी सारखी ही निवडणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मेट्रोच्या कामामुळे चंद्रकांत पाटील यांच्या मतात घट?

कोथरूड भागात मेट्रोचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी तासनतास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मोठमोठ्या मशीनमुळे सातत्याने आवाज होतो. पर्यायी रस्ते नसल्याने कोथरूडकर वैतागले आहेत. शिवाय मेट्रोचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांच्या मताधिक्यात घट झाल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.