Pune: पुणे महापालिकेच्या कामकाजावर भाजप प्रदेशाध्यक्ष संतप्त

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत भाजपला 98 नगरसेवक देत पुणेकरांनी एकहाती सत्ता दिली. त्यानंतर 2017 च्या अंदाजपत्रकात भाजपनेही नको नको त्या घोषणांचा पाऊस पडला, मात्र पुणे महापालिकेत अपेक्षित कामकाज होत नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संतप्त झाले आहेत. आता पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला कमालीचे अपयश आले आहे. हडपसर आणि वडगावशेरी हे 2 हक्काचे मतदारसंघ गमवावे लागले. या दोन्ही मतदारसंघातील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. पक्षाने जेष्ठ नेते विनोद तावडे आणि विजमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सोडले नाही तर तुमचे काय, आशा शब्दांत पाटील यांनी कानउघाडणी केल्याची चर्चा आहे.

महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, महापालिकेचे सुसज्ज हॉस्पिटल, अशा अनेक मोठमोठ्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. कोथरूड मतदारसंघात चंद्रकांत पाटील हे 1 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास नगरसेवक, कार्यकर्ते व्यक्त करीत होते, मात्र केवळ 25 हजार मतांनी पाटील यांचा विजय झाला. राष्ट्रवादी – काँगेस- मनसे असा कोथरूडचा ‘पॅटर्न’ तयार झाला आहे. मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी तब्बल 80 हजार मते घेतली. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कमी मतांनी विजयी झाल्याने पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवकांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दरम्यान, कसबा आणि पर्वती मतदारसंघ वगळता शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघांत केवळ 5 – 5 हजार मतांनी भाजपचे उमेदवार विजयी झालेत. तर, खडकवासला मतदारसंघात भिमराव तापकीर यांनी केवळ 2500 मतांनी विजय मिळविला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.