Suresh Kalmadi : सुरेश कलमाडी यांच्या कार्यक्रमाला भाजपचे बडे नेते; पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली

एमपीसी न्यूज – पुण्याच्या राजकारणात एकेकाळी प्रचंड दबदबा असणारे काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी भाजपशी जवळीक वाढविण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि कलमाडी यांची हातमिळवणी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याला कारण ठरले आहे सुरेश कलमाडी यांचा पुणे फेस्टिव्हल.

पुणे फेस्टिव्हलचे शुक्रवारी उद्घाटन होणार असून या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पुण्यात कलमाडी व भाजपच्या जवळीकीची चर्चा रंगली आहे.

2011 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील गैरव्यवहारामुळे सुरेश कलमाडी यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागले होते.त्यामुळे एकेकाळी पुणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा असणारे सुरेश कलमाडी यांची राजकीय इनिंग अचानक संपुष्टात आली होती.

काँग्रेसने कलमाडी यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. मात्र आता दहा वर्षे उलटूनही काँग्रेसने त्यांना लांब ठेवले आहे. सुरेश कलमाडी यांच्याविरुध्दचा खटला अजूनही सुरु आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होऊ शकले नव्हते.

त्यामुळे आता कलमाडी यांनी स्वत:वरील कलंक धुवून काढण्यासाठी भाजपचा उपयोग करुन घेण्याचा मार्ग निवडला आहे का अशी चर्चा होऊ लागली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.