Pune News : ब्रिटीश काउंसिल आणि महाराष्ट्र सरकारच्या भागीदारीतून विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार शिक्षण

एमपीसी न्यूज – शैक्षणिक संधी आणि सांस्कृतिक संबंधांसाठी युनायटेड किंग्डमच्या ब्रिटीश काउंसिल या आंतरराष्ट्रीय संस्थेने महाराष्ट्र सरकारसोबत सफल शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी केलेल्या भागीदारीला आज 10 वर्षे पूर्ण झाली. या अवधीमध्ये (2012-21) ह्या कार्यक्रमांद्वारे 2,000 मास्टर ट्रेनर्स आणि 1 लाख 46 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील सरकारी शाळेतील 4.38 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि ब्रिटीश काउंसिलचे पश्चिम भारत संचालक डॉ. जोवन लिसे यांच्या उपस्थित कार्यक्रमावरील स्वतंत्र मूल्यमापन अहवालाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपक्रमासाठी योगदान देणा-या टाटा ट्रस्टसह भागीदार व मुख्य भागधारकांच्या सहभागाची दखल घेतली गेली.

2012-21 ह्या काळात महाराष्ट्र सरकारने चार जिल्हा स्तरीय प्रकल्पांची सुरुवात केली होती. राज्यातील सरकारी प्राथमिक व माध्यमिक शालेय शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या इंग्रजीत सुधारणा करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. इंग्रजी भाषा प्रशिक्षण व अध्यापनशास्त्राच्या आपल्या व्यापक अनुभवाच्या आधारे ब्रिटीश काउंसिलने ह्या चार प्रकल्पांचे वैशिष्ट्यपूर्ण आरेखन केले व ते राबवले. 10 वर्षांच्या कार्यक्रमाने ‘प्रशिक्षण एक कार्यक्रम’ नाही तर ‘प्रशिक्षण एक प्रक्रिया’ अशी मानसिकता बदलण्यासाठी काम केले.

वर्षा गायकवाड म्हणाल्या,’विद्यार्थ्यांच्या अध्ययन व शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ब्रिटीश काउंसिलचा अहवाल बघून आनंद होत आहे. तेजस, प्राथमिक शाळांसाठी इंग्रजी भाषा उपक्रम ,माध्यमिक शाळांसाठी इंग्रजी भाषा उपक्रम आणि इंग्लिश फॉर ऑल मुंबई अशा कार्यक्रमांमुळे शिक्षकांच्या योग्यतेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण मिळाले आहे.’

ब्रिटीश काउंसिलचे पश्चिम भारताचे संचालक डॉ. जोवन लिसे म्हणाले, ‘राज्यातील सरकारी शाळांमधील इंग्रजी प्रभूत्वाच्या स्तरामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि राज्य सरकारच्या ज्ञान संबंधित उद्दिष्टांना सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा दीर्घकालीन भागीदार असल्याचा आम्हाला आनंद आहे. शिक्षकांच्या शाश्वत विकासाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराच्या सातत्याने स्पर्धात्मक होणा-या जगतामध्ये सफल होण्यासाठी ह्या प्रणालीद्वारे मदत दिली जात आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.