Pune : आर्थिक स्वास्थ्यासाठी ‘सीए’ महत्वपूर्ण

डॉ. रणजित पाटील यांचे मत; 'आयसीएआय'तर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद

एमपीसी  न्यूज – “आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी जसा डॉक्टर महत्वाचा आहे, तसाच आर्थिक स्वास्थ्यासाठी सनदी लेखापाल (सीए) महत्वाचा आहे. त्यामुळे लेखापालांनी व्यक्ती, संस्था यांचे आर्थिक आरोग्य जपण्याला प्राधान्य द्यावे,” असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी व्यक्त केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे आणि  दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल अंतर्गत पुणे, अकोला, नागपूर, औरंगाबाद, अमरावती व जळगाव शाखेतर्फे ‘जीएसटी’वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. त्यावेळी  ते बोलत होते. शेगाव येथील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या राष्ट्रीय परिषदेला आयसीएआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल छाजेड, सीपीई कमिटीच्या के. श्रीप्रिया, आयसीएआय, पुणेचे चेअरमन आनंद जाखोटिया, ऋता चितळे, अभिषेक धामणे, रेखा धामणकर, सीए एस. बी. झावरे, सर्वेश जोशी, एस. जी. मुंदडा आदी उपस्थित होते.

डॉ. रणजित पाटील म्हणाले, “सामान्य माणसाला आर्थिक व्यवहार नियोजन फारसे कळत नाही. शिवाय इतर कामांमुळे ते पाहणेही शक्य नसते. अशावेळी अकाउंटंटवर महत्वाची जबाबदारी असते. व्यक्तीचे अथवा कंपनीचे आर्थिक आरोग्य सांभाळणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे सीएचे काम आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही जीएसटी दिवसानिमित्त सीएच्या कामाचे कौतुक केले असून, देशाच्या आर्थिक विकासात सीए महत्वाची भूमिका बजावत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. त्यामुळे सीएनी आपली जबाबदारी ओळखून योगदान द्यावे.”

सीए आनंद जाखोटिया म्हणाले, “या परिषदेत देशभरातून 750 पेक्षा अधिक, तर पुण्यातून 200 सीए सभासद सहभागी झाले होते. आयसीएआयच्या पुणे शाखेच्या पुढाकारातून होणारी ही तिसरी राष्ट्रीय परिषद असून, यापूर्वी जून महिन्यात शिर्डी येथे 500 सीएंसाठी, तर पुणे येथे 800 सीएंसाठी परिषद घेण्यात आली होती.” उमेश अग्रवाल, उमंग अग्रवाल यांनी राष्ट्रीय परिषदेचे समन्वयन केले. जीएसटी ऑडिट, टॅक्स क्रेडिट, अपहार अंकेक्षण, आयकर अधिकनियम व दंड, टँक्सेशन आदी विषयावर विविध सत्रे झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.