Pimpri : चाकूचा धाक दाखवून कार चालकाला लुटले; एका महिन्यातील दुसरी घटना

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला लघुशंकेसाठी थांबलेल्या कार चालकाला लुटून महत्वाची कागदपत्र आणि कार जबरदस्तीने नेल्याचा प्रकार 12 जुलै रोजी हिंजवडी येथे घडला. या प्रकाराला एक महिनाही उलटला नाही; तोपर्यंत रविवारी (दि. 5 ऑगस्ट) आणखी एका कार चालकाला लुटून त्याची कार जबरदस्तीने नेली. हा प्रकार संतोषी माता चौक, नेहरूनगर, पिंपरी येथे रविवारी रात्री अकराच्या सुमारास घडला.

आजिनाथ नागरगोजे (वय 32, रा. देहूगाव, पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरगोजे रविवारी रात्री त्यांच्या कारमधून (वॅगन आर) जात होते. अचानक दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांची कार थांबवली. त्यांना चाकूचा धाक दाखवला. नागरगोजे यांच्या कारमधील एक मोबाईल फोन, महत्वाची कागदपत्रे आणि कार असा एकूण 2 लाख 5 हजार 100 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन गेले.

अशाच प्रकारची घटना 12 जुलै रोजी बावधन येथील चांदणी चौक येथे घडला होता. त्या प्रकरणातील कार एका खाजगी कंपनीचे कर्मचारी वाहतूक करीत होती. कंपनीतील कर्मचा-यांना आणण्यासाठी जात असताना कात्रज देहूरोड बायपास रोडवर चांदणी चौकाजवळ कार चालक लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी अज्ञात दोघेजण कारमधून त्यांच्याजवळ आले. दोघांनी मिळून चालकाला दमदाटी करून त्यांच्याजवळ असलेले बँकेचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड, महत्वाची कागदपत्रे आणि कार असा एकूण 8 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.