Chakan Accident News : चाकणमध्ये तीन तर हिंजवडीत एक अपघात; दोघांचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – चाकण परिसरात तीन अपघात झाले. त्यात दोघांचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हिंजवडी येथे एक अपघात झाला असून त्यात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. 27) चाकण आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

चाकण परिसरातील अपघाताच्या पहिल्या घटनेत हरी निवृत्ती ओव्हाळ (वय 50, रा. भोसे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा चुलत भाऊ संदेश भीमराव ओव्हाळ (वय 47, रा. भोसे, ता. खेड) याचा मृत्यू झाला आहे. संदेश ओव्हाळ हे शेलपिंपळगाव येथील मार्केट यार्ड जवळ रस्त्याने पायी चालत जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. त्यात संदेश यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताच्या दुस-या घटनेत पोलीस हवालदार गोरख गाडीलकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर अरुणराव कुलकर्णी (वय 36, रा. बालाजी नगर, चाकण) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयत समीर कुलकर्णी हे दुचाकीवरून जात असताना डोंगरवस्ती निघोजे ते स्पायर चौककडे जाणा-या रस्त्यावर एका बसने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात समीर कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बस चालक हितेंद्र सुधाकर भांगले (वय 46, रा. खिरडी, ता. रावेर, जि. जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताच्या तिस-या घटनेत विकास पोपट लोहार (वय 31, रा. चक्रपाणी वसाहत भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी लोहार हे स्कोडा कंपनीची टेस्टिंग कार चालवत चाकण-तळवडे रस्त्याने जात होते. त्यावेळी एका दुचाकीने फिर्यादी चालवत असलेल्या कारला जोरात धडक दिली. त्यात दुचाकीस्वार मुन्ना बिहारी पासवान (वय 35, रा.नेहरू नगर, पिंपरी. मूळ रा. बिहार) आणि त्याचा सहप्रवासी जोगेंद्र सुरेश पासवान (वय 33) हे दोघेजण जखमी झाले आहेत. दुचाकी चालक मुन्ना पासवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कविता ज्ञानेश्वर पाटील (वय 28, रा. हिंजवडी फेज एक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कविता पाटील त्यांच्या दुचाकीवरून मुंबई बेंगलोर महामार्गावरून जात असताना हॉटेल पुणेरी बिर्याणी समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. त्यात फिर्यादी रस्त्यावर पडल्या आणि त्यात त्या जखमी झाल्या. अज्ञात वाहन चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पळून गेला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.