Chakan : अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे कोथिंबीर एक रुपयाला जुडी

मेथी व शेपूची गड्डी तीन ते चार रुपयांना

एमपीसी न्यूज- अवकाळी पावसाच्या दमदार सरींमुळे पालेभाज्या उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले आहेत. मागील दोन दिवस सातत्याने आलेल्या अवकाळी पावसाने चाकणमध्ये भाजीपाल्याचा अक्षरशः कचरा झाला. कोथिंबीरीची एक जुडी चक्क 1 रुपया दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. मेथी, शेपूच्या जुड्याही अवघ्या तीन ते चार रुपयांना विक्री केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अवकाळी पावसाने नुकसान नको म्हणून पालेभाज्यांची काढणी करून त्या बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून करण्यात आला. मात्र, या पालेभाज्या भिजलेल्या असल्यामुळे त्यांना खरेदीदार मिळाले नाहीत. शिवाय मार्केटमध्ये अपेक्षित ग्राहकदेखील नसल्याने भाज्या मातीमोल झाल्याचे चित्र गुरुवारी बाजारात पहावयास मिळाले.

मागील दोन दिवसांत पालेभाज्यांचा अक्षरशः कचरा झाला असून कोथिंबीर कचर्‍यात फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर आणि आडते व व्यापार्‍यांवर आली असल्याचे चित्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण (ता. खेड) मार्केटमध्ये पहावयास मिळत आहे. मागील दिन दिवसांत फळभाज्या आणि पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे आडते असोसिएशनच्या अध्यक्ष व सदस्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.