Chakan Crime : चालकाला चाकूचा धाक दाखवून कंटेनर पळवला

एमपीसी न्यूज – एका कंपनीतून भरलेला माल दुस-या कंपनीत रिकामा करण्यासाठी जात असलेल्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून चार जणांनी मिळून आठ लाखांच्या कंटेनर मधील माल जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 21) रात्री अकरा वाजता खेड तालुक्यातील संतोषनगर परिसरात घडली.

अंकुश लक्ष्मण केंद्रे (वय 40, रा. शिरसाठवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या कंटेनरमध्ये (एम एच 12 / पी क्यू 5301) संतोषनगर येथील टाटा कंपनीच्या वेअर हाऊस मधील स्पेअर पार्टचा माल भरून रोहकल येथील एका कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये रिकामा करण्यासाठी जात होते. सोमवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास ते कंटेनर घेऊन जात असताना संतोषनगर येथील ठाकूर पिंपरी रोडवर अनोळखी चार चोरट्यांनी त्यांची दुचाकी कंटेनरला आडवी लागली आणि कंटेनर थांबवला.

त्यानंतर आरोपींनी फिर्यादी अंकुश यांना चाकूचा धाक दाखवून डोळ्याला रुमाल बांधला. चोरट्यांनी कंटेनर चालवत नेऊन त्यातील आठ लाख रुपयांचा स्पेअर पार्टचा माल जबरदस्तीने चोरून घेतला. तसेच आरोपींनी फिर्यादी अंकुश यांच्याकडील दीड हजारांची रोख रक्कम देखील चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.