Chakan : मेदनकरवाडीच्या महिला सरपंचाचा पंतप्रधानांशी संवाद

एमपीसी न्यूज – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचायत राज दिनानिमित्त देशभरातील काही निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज (शुक्रवारी) संवाद साधला. यात चाकणच्या मेदनकरवाडी येथील सरपंच प्रियंका मेदनकर चौधरी यांचा ही समावेश होता. पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्याची इच्छा पूर्ण झाली असल्याची प्रतिक्रिया सरपंच प्रियंका मेदनकर चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

पुण्यातील खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रियांका मेदनकर चौधरी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी संवाद साधला. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याची संधी मिळू शकते, असा फोन जिल्हा परिषदेमधून सीओ यांच्याकडून सरपंच प्रियंका यांना आला होता. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्रातून एकमेव प्रियांका यांची निवड झाल्याचे दिल्लीहून पंतप्रधान कार्यालयातून फोनद्वारे सांगण्यात आले आणि शुक्रवारी अकराच्या सुमारास तयार राहण्यास सांगितले असेही प्रियांका मेदनकर यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली असे प्रियंका यांनी सांगितले. प्रियंका यांचे वडील रामदास मेदनकर हे मेदनकरवाडीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य आहेत. प्रियांका यांच्या आई देखील याच ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत.

मेदनकरवाडी ही चाकणच्या औद्योगिक भागात येत असल्याने अनेक परराज्यातील नागरिक या ठिकाणी कामाला आहेत. त्यामुळे पंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या असल्याचे सरपंच प्रियांका मेदनकर व रामदास मेदनकर यांनी संगीतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.