Chakan News: भोसे येथे गोळीबारात तरुण गंभीर जखमी; दोघा भावांना पिस्तुलासह अटक

एमपीसी न्यूज – भोसे (ता. खेड,जि.पुणे) (Chakan News) येथे मध्यरात्रीच्या वेळी एकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात छातीत गोळी लागल्याने एक जण गंभीर जखमी झाला असून चाकण पोलिसांनी दोघा भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

प्रसाद खांडेभराड (वय 22, रा. कडाचीवाडी, ता. खेड) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  या प्रकरणी सूरज ऊर्फ उद्धव कुटे (वय 25), सौरभ कुटे (वय 23, रा. भोसे) या दोन भावांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याची माहिती चाकण पोलिसांनी (Chakan News) दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी दि. 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भोसे ते काळुस रस्त्यावर सदरची घटना घडली आहे.

Pavana Dam Update : पवना धरणात 94 टक्के पाणीसाठा, तरी एकदिवसाआड पाणी का?

गुरुवारी रात्री दहा ते अकराचे सुमारास फिर्यादी प्रसाद  खांडेभराड व त्याचा मित्र सूरज ऊर्फ उद्धव कुटे यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यातून फिर्यादी खांडेभराड याने उद्धव कुटे याला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी आपसातील वाद मिटविला.

पुन्हा फिर्यादी प्रसाद हा आरोपी कुटे याला गाडीवरून सोडण्यासाठी त्याच्या घरी गेला. त्यावेळी आरोपीचा भाऊ सौरभ कुटे याला आपल्या भावाला प्रसाद कडून मारहाण झाल्याची माहिती मिळाली.  त्यानंतर सौरभ कुटे व त्याच्या मित्रांनी फिर्यादी प्रसाद खांडेभराड याला जबर मारहाण करून  गावठी पिस्तूलमधून फिर्यादी प्रसाद खांडेभराड याच्यावर गोळी झाडली. छातीत गोळी लागून प्रसाद गंभीर जखमी झाला.

त्यानंतर चाकण पोलिसांच्या पथकाने खेड तालुक्यातील राजगुरुनगर जवळील सातकरस्थळ परिसरातून आरोपीच्या नातेवाईकाच्या घरातून आरोपी सूरज व सौरभ कुटे यांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल हस्तगत करण्यात आले आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास चाकण (Chakan News) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, प्रसन्न जराड करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.