Pavana Dam Update : पवना धरणात 94 टक्के पाणीसाठा, तरी एकदिवसाआड पाणी का?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात 93.64 टक्के म्हणजेच वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे आता तरी दररोज पाणीपुरवठा होईल अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. परंतु, ती फोल ठरली. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही  मागील साडेतीन वर्षांपासून सुरु असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा आजही कायम आहे. पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा, तरी एकदिवसाआड पाणी का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तर, दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा पावसाने ओढ दिली होती. जून महिना संपेपर्यंत धरण क्षेत्रात पाऊस पडला नव्हता. त्यामुळे पाण्याचे संकट वाढण्याची चिन्हे होती. पण, 15 जुलैनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. धुंवाधार पाऊस पडत होता.  नदी नाले, ओढे तुडुंब भरुन वाहत आहेत. पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणातील येवा वाढला.  1 जूनपासून धरण क्षेत्रात 1970 मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, 75 टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

Pune Accident : शिवाजीनगर येथे दुध वाहतूक टेम्पोला अपघात, रस्त्यावर दुधाचे पाट

आजमितीला धरणात 93.64 टक्के पाणीसाठा आहे. पुढील वर्षभर म्हणजेच जुलै 2024 पर्यंत पुरेल एवढा हा साठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता संपली. धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाल्याने मागील साडेतीन वर्षांपासून सुरु असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्यातून सुटका होईल. दररोज पाणी मिळेल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली.

एका दिवसाआड सुरु असलेला पाणीपुरवठा कायम राहणार आहे. पाणी कतापीपासून शहरवासीयांची सुटका झालेली नाही. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत  नोव्हेंबर 2019 पासून पहिल्यांदा दोन महिन्यांसाठी एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्यांनतर तो कायम ठेवण्यात आला आहे. आता धरणात मुबलक पाणीसाठा झाल्यानंतरही पाणी कपात कायम राहणार आहे. त्यामुळे शहरवासीयांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

पवना धरणात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने सर्वांना समान पाणीपुरवठा होतो. तक्रारींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दिवसाआडच पाणीपुरवठा सुरु राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.

पवना धरणाची आजची परिस्थिती

  • गेल्या 24 तासात झालेला पाऊस – 23 मि.मि.
  • 1 जूनपासून झालेला पाऊस = 1970 मि.मि.
  • गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस =      1585
    धरणातील सध्याचा पाणीसाठा = 93.64 टक्के
  • गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 80.73 टक्के
  • गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ = 0.85  टक्के
  • 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 75 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.