IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जकडून पंजाब किंग्जचा दणदणीत पराभव… बोले तो… धो डाला!

एमपीसी न्यूज : (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या कालच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला तब्बल 6 गडी आणि 4.2 षटके राखून दणदणीतरित्या हरवले आणि आयपीएलमध्ये आपल्या विजयाचे खाते उघडले. 

टॉस जिंकून गोलंदाजी घेणाऱ्या सुपर कुल देश विदेश का लाडला माही उर्फ महेंद्रसिंग धोनीचे आजचे सर्व फासे शकुनीपेक्षाही अनुकूल पडत गेले. त्यात दीपक चहरने अत्यंत जबरदस्त आणि घातकी गोलंदाजी करत के एल राहुलच्या किंग्ज पंजाबला जराही डोके वर काढू दिले नाही. के एल राहुल, मयंक अगरवाल, दीपक हुडा आणि बिग बॉस म्हणून ओळखला जाणारा ख्रिस गेल अवघ्या धावांत तंबूत परतले आणि किंग्ज पंजाबची गाडी पटरीवरून उतरली ती उतरलीच. तिला काय नंतर ट्रॅक सापडला नाही तो नाहीच!

अपवाद शाहरुख खानचा (वानखेडेवर पाऊल टाकणार नाही अशी कसम खाणारा फिल्लमबाज नाही तर नवोदित आक्रमक आणि भावी (?) सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा) त्याने 47 धावा करताना संघाची बाजू सावरण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पण ती वांझोटीच ठरली, दुसऱ्या बाजूने त्याला जराही साथ न मिळाल्याने संघाची धावसंख्या म्हणावी तशी फुगली नाही.

आणि निर्धारित 20 षटकात केवळ 107 धावांचे तुटपुंजे आव्हान बलाढ्य चेन्नईपुढे उभे राहिले, चहरला सॅम करण, जडेजा, मोईन अली यांनी एकेक बळी घेत उत्तम साथ दिली, पण आजचे वैशिष्ट्य होते ते जडेजाने डोळ्याची पापणी लवायच्या आत राहुलला ज्या पद्धतीने धावबाद केले तो क्षण बम्बय्या भाषेत ‘बोले तो भिडू एकदम झकास’ होता, कौतुक करावे तेवढे कमीच, जडेजाचे फीट होणे कोहलीसाठी जणू ब्रह्मास्त्र प्राप्त झाल्यासारखे आहे.

चित्त्याच्या चपळाईने तो बॉलकडे ज्या पद्धतीने झेपावतो ना, ते बघून फलंदाज एखाद्या तिखट बाऊन्सरला सुद्धा घाबरणार नाही तितका जडेजाच्या चपळाईला घाबरतो. 107 धावांचे माफक आव्हान घेऊन ऋतुराज गायकवाड आणि फ्लापु द फ्लेसिसबरोबर सलामीची सुरूवात केली खरी, पण मागच्या सीझनमध्ये सातत्याने खेळणारा ऋतुराज आज वानखेडेवर मात्र ना टिकून खेळला, ना आत्मविश्वासाने!

त्याची धांदल पाहून अर्शदीप त्याला अलगद जाळ्यात पकडले आणि 16 चेंडूत केवळ सहा धावा करून तो तंबूत परतला आणि यानंतर धोनीने अचानकपणे मोईन अलीला तिसऱ्या नंबरवर चक्क सुरेश रैना ऐवजी प्रमोट केले, ज्या रैनाने या नंबरवर जवळपास 5000 धावा केल्या आहेत, पण असे का ते धोनीच जानो, म्हणतात ना धोनी आणि थोरल्या पावरबाज साहेबांच्या मनातले कोणालाही कळत नाही ते उगाचच नाही, आणि हा डाव किती योग्य होता

हे मोईन अलीने काही वेळातच सिद्ध केले. खाते उघडतानाच त्याने तो ऑफसाईडला जो नेत्रदीपक चौकार मारला त्याने मोईनचा विश्वास वाढला आणि राहुलचा पुरता ढासळला. पुढे मग त्याने केवळ 31 चेंडूतच सात चौकार आणि एक जोरदार षटकार मारत 46 धावा केल्या. ज्यामुळे आधीच किरकोळ वाटणारे 108 रन्सचे आव्हान, आव्हानच राहिले नाही. दुर्दैवाने मोईन आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही. त्याचाही  फटकेबाजीच्या नादात विश्वामित्र झाला आणि मोह आवरता आला नाही.

अर्धशतक पूर्ण करण्याची सोन्यासारखी संधी गमावून बाद झाला. पाठोपाठ शमीने अंबाती रायडू आणि रैनाला परतवून उगाचच चुरस आणण्याचा प्रयत्न केला खरा, पण दुसऱ्या बाजूने फ्लासिसने आपला अनुभव पणाला लावत विजयी गुढी उभारली आणि तब्बल सहा गडी राखून चेन्नईचा या स्पर्धेतले गुणांचे खाते उघडले आत्तापर्यन्तचे रोमांचक सामने पाहिल्यानंतर आजही अशाच सामन्यची उत्सुकता असणाऱ्यांची निराशा झाली खरी, पण या दणदणीत विजयाने चेन्नई आणि माही समर्थक मात्र मनापासून आंनदी झाले आणि मुंबईच्या भाषेत ‘क्या धो डाला भाई अपुनने पंजाब को’ म्हणू लागले तो उसमे गलत है ही क्या? सही बात है ना भाई लोग? चार ओव्हर्समध्ये चार बळी मिळवून महेंद्रसिंग धोनी चेन्नई संघाचा कर्णधार म्हणून 200 व्या सामन्यात विजयी भेट देत सामनावीर ठरला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.