Pune News: मुख्यमंत्रीसाहेब इच्छा मरणाला परवानगी द्या; लोककलावंतांची आर्त हाक

चित्रपट, मालिकांच्या शूटिंगला शासनाने परवानगी दिली आहे, त्याच धर्तीवर फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियमावली लागू करून सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी द्यावी.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊननंतर महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’चा नारा दिला गेला असला तरी नाट्यगृह आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे लॉक अद्याप उघडण्यात आलेले नाही. यामुळे हातावर पोट असलेले लोककलावंत मागील सहा महिन्यापासून बेरोजगार आहेत. आता सांस्कृतिक कार्यक्रमांना सरसकट परवानगी द्या, अन्यथा इच्छामरणाला परवानगी द्या, अशी मागणी महाराष्ट्र कला मंडल या कलावंतांच्या शिखर संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

या विषयी बोलताना संस्थेचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले की, मागील सहा महिन्यांपासून लॉककडाऊन असल्यामुळे लोककलावंत बेरोजगार आहेत. होळी पौर्णिमा ते बुद्ध पौर्णिमा हा महाराष्ट्रातील गावं खेड्यातील जत्रा, यात्रांचा हंगाम असतो.

मात्र यंदा तो कलावंतांना मिळालेला नाही. सार्वजनिक गणेशोत्सवात कलावंतांना सादरीकरणातून काही प्रमाणात अर्थाजन झाले असते परंतु महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवावर मर्यादा घातल्याने ती संधीही कलावंतांना मिळालेली नाही.

चित्रपट, मालिकांच्या शूटिंगला शासनाने परवानगी दिली आहे, त्याच धर्तीवर फिजिकल डिस्टन्सिंग आणि इतर नियमावली लागू करून सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने परवानगी द्यावी. पुणे, मुंबई शहरात मॉल सुरू करण्यात आले आहेत, मॉल्सपेक्षा कमी गर्दी सांस्कृतिक कार्यक्रमात असते यामुळे राज्यातील सर्व नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करावेत अशी मागणी खाबिया यांनी केली आहे.

महाकला मंडलचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले, कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचा सर्वाधिक फटका लोककलावंत, बॅकस्टेज आर्टिस्ट, कामगार यांना बसला आहे. लॉकडाऊनच्या काळात समाजातील विविध घटकांनी आघार दिला होता, मात्र आता या लोकांना रोजगार मिळत नसल्याने बहुतांश कलावंताचे जगणे मुश्किल झालेले आहे.

सरकारने अनलॉक, मिशन बिगिन अगेन घोषणा केली असली तरी सांस्कृतिक क्षेत्रावरची बंधने अद्याप शिथिल झालेली नाहीत. सरकारने गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात सर्व लोकलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची परवानगी द्यावी आणि जर शासन लोककलावंतांना सन्मानाने जगण्यासाठी कार्यक्रम करण्याची परवानगी देऊ शकत नसेल तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.