Pune : वाचनातून काय समजले हे मुलांना विचारणे गरजेचे – डॉ. राजेंद्र कुंभार

एमपीसी न्यूज – प्रत्येक मूल हे अनुकरण प्रिय असल्याने त्यांना वाचनाची गोडी लावण्यासाठी वाचनातून त्याला रोल मॉडेल अभिप्रेत व्हायला हवे. त्यामुळे त्याने काय वाचले हे विचारण्यापेक्षा वाचनातून काय समजले हे विचारणे गरजेचे असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाचे प्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार यांनी आज येथे व्यक्त केले.

मराठी अध्यापक संघाच्या वतीने आळंदी येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या राज्यस्तरिय चिंतन शिबिरात ‘वाचनातून घडवा मुलांचे व्यक्तिमत्त्व’ या विषयावरील चर्चेमध्ये ते बोलत होते. मुंबईतील मराठी विषयाच्या तज्ज्ञ संपदा जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

डॉ. कुंभार यांनी म्हटले, वास्तविक शिक्षक, ग्रंथपाल आणि पालक ही त्रिसूत्रीच वाचनाचा पाया रूजवणारे स्तंभ असून मुलाचा जन्म होण्यापूर्वीपासून त्याच्यावर वाचनाचे संस्कार रूजवता येऊ शकतात हे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध केले आहे. आज माध्यमांचा विळखा वाढल्याने व वाचनाला मारक गोष्टी मनपटलावर आदळत असल्याने मूलांचे वाचन कमी होत आहे. मात्र, यावर चिंता व्यक्त न करता सर्वांनी वाचनाला पूरक वातावरण व बाहयपरिस्थिती निर्माण करणे गरजेचे असल्याचे म्हटले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात संपदा जोशी यांनी, वाचन चळवळ व वाचन विकास रूजविण्यासाठी पालकांबरोबरच शिक्षकांचाही महत्त्वपूर्ण सहभाग असण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.