Chinchwad : मौजमजेसाठी वाहनचोरी करणा-या चोरट्यास अटक; पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी दुचाकी चोरणा-या एका चोरट्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील तीन वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले असून इतर दोन वाहनांच्या मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

सुरज शिवाजी भालेराव (वय 20, रा. डांगे चौक. मूळ रा. मंचर, ता. आंबेगाव, पुणे) असे अटक केलेल्या दुचाकीचोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड परिसरात अँटी गुंडा कारवाई करत असताना पोलिसांना बिर्ला हॉस्पिटलकडून वाल्हेकरवाडीच्या दिशेने नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून एकजण संशयितरित्या जाताना आढळला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली. त्याबाबत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी दुचाकीची माहिती घेतली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. ही दुचाकी (एम एच 14 / एफ यु 9520) चोरीला गेल्याचा गुन्हा चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल आहे.

पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाकडे कसून चौकशी केली असता त्याने पाच दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या. त्यातील तीन दुचाकींबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तीन गुन्ह्यांची उकल झाली असून एम एच 16 / बी एन 9264 आणि एम एच 12 / जे एच 3849 या दोन दुचाकींच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस कर्मचारी जगताप, पाटील, आखाडे, माने, डोके, राठोड, रूद्राक्षे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.