Chinchwad : रात्रभर बंदोबस्त, शहरभर गस्त; नागरिकांची सुरक्षा राखत पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या नवीन वर्षाची सुरुवात

एमपीसी न्यूज – गत वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत व्हावे. दरम्यान कोणताही अनुचित (Chinchwad) प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या पहाटे शहरात चोख बंदोबस्त ठेवला. यामुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता शहरवासीयांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 31 डिसेंबर आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गर्दीच्या व संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. पिंपरी, चिंचवड, हिंजवडी, वाकड परिसरात मोठी हॉटेल्स आणि मॉल आणि चर्च आहेत. या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेत गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.

Talegaon Dabhade : सरस्वती विद्या मंदिरमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून रविवारी (दि. 31) रात्री चेकिंग करण्यात आली. संशयित व्यक्ती, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. महिला सुरक्षा, सोन साखळी चोरी, पाकीट चोरी अशा गुन्ह्यांचा प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथके नेमली होती.

31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, 12 पोलीस निरीक्षक, 26 सहायक निरीक्षक/उपनिरीक्षक, 241 पोलीस अंमलदार, 30 ड्रंक अॅंड ड्राईव्ह पथक नेमले होते. तसेच 40 ठिकाणी वाहतूक पोलीस नाकाबंदी लावली होती.

पिंपरी-चिंचवड शहर आयुक्तालयाच्या हद्दीत एक अपर पोलीस आयुक्त, 4 पोलीस उपायुक्त, 9 सहायक पोलीस आयुक्त, 1357 पोलीस अंमलदार, 8 स्ट्रायकिंग, 33 दामिनी पथक, 3 छेडछाड विरोधी पथक, 5 आरसीपी, 3 जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) आणि 65 पेट्रोलिंग मोबाईल असा बंदोबस्त लावण्यात आला.

पोलीस आयुक्तांकडून ठिकठिकाणी पाहणी

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील महत्वाच्या चौकांमध्ये जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली. पोलिसांना खबरदारीच्या सूचना केल्या. शहरात सुरु असलेल्या बंदोबस्ताचा पोलीस आयुक्तांनी वेळोवेळी आढावा घेतल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील बंदोबस्तात कसर न ठेवता चोखपणे कर्तव्य बजावले. स्वतः पोलीस आयुक्त रात्रभर शहरातून फिरत असल्याने पोलिसांमध्ये देखील उत्साह होता.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी बंदोबस्त

31 डिसेंबरच्या रात्री जागरण झालेले असताना वर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी) पोलिसांना पुन्हा बंदोबस्तासाठी हजर राहावे लागले. 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव जवळ पेरणे फाटा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी एकत्र येतात. दरम्यान, पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या हद्दीत वाहतूक वळवणे आणि इतर बंदोबस्त ठेवला जात आहे. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी पिंपरी-चिंचवड शहर परिसरात देखील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना 1 जानेवारी रोजी पुन्हा दिवसभर बंदोबस्तावर हजर राहावे लागले(Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.