Chinchwad Bye Poll : राष्ट्रवादीचे ‘युवराज’ प्रचाराच्या रणधुमाळीपासून अलिप्त

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bye Poll) राज्यातील महाविकास आघाडीच्या सगळ्याच मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली, परंतु प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या आणि अस्तित्वाच्या या लढाईत 2019 चे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि राष्ट्रवादीचे ‘युवराज’ पार्थ पवार मात्र लांब राहिल्याचे दिसून आले.

चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार, धनंजय मुंढे यांसह अनेक आमदारांनी मतदारसंघ पिंजून काढला. सोबत काॅंग्रेसच्या राज्यपातळीवरील नेत्यांची फौज होती.

शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांनीही जाहीर सभा आणि रोड शोच्या माध्यमातून मतदारांसोबत संवाद आणि संपर्क साधला.  परंतु, या पोटनिवडणुकीच्या कालावधीत कोपरा सभा, रोड शो, जाहीर सभा, पदयात्रा या ठिकाणी पार्थ पवार हे एकदाही उपस्थित राहिले नाहीत.

Charholi News : इंद्रायणी नदीची जलपर्णीमुळे दुर्दशा; चऱ्होलीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात – विनया तापकीर

राष्ट्रवादीचे खासदार डॅा. अमोल कोल्हे हे चिंचवड आणि पुण्यातील कसबा मतदार संघांतील स्टार प्रचारक होते. परंतु, ते देखील दोन्हीही मतदार संघात एकदाही फिरकले नाहीत. शिवाय एका जाहीर कार्यक्रमात शिट्टी वाजवून त्यांनी चिंचवडमधील अपक्ष उमेदवाराला आपला पाठिंबाच असल्याचे सूचित केले. यामुळे महाविकास (Chinchwad Bye Poll) आघाडीची काहीशी अडचण झाली.

मावळ लोकसभा मतदारसंघात चिंचवड मतदार संघ येतो. सुमारे पाच लाख 67 हजार मते असलेल्या या मतदारसंघात या निमित्ताने 2024 च्या लोकसभेची रंगीत तालीम म्हणूनही पाहता आले असते, परंतु पार्थ पवार यांनी या सर्व निवडणूक प्रकियेपासून बाजूला राहणे पसंत केलेले दिसते.

मावळ लोकसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना रिंगणात उतरवले होते. ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना मतदारसंघात संपर्क साधण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. या पार्श्वभूमीवर पराभवानंतर ते मतदारसंघात संपर्क कायम ठेवतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात निवडणूक एक वर्षावर येऊन ठेपल्यानंतर देखील पार्थ पवार अजूनही सक्रिय न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

यावरुन मावळ मतदार संघात 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पार्थ पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार नसतील किंवा ते या ठिकाणी निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक नाहीत, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.