Chinchwad : चंद्रकात पाटील यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या मुख्य सूत्रधारांना अटक ; तिन्ही आरोपी जेरबंद

Chief facilitator arrested for demanding ransom in the name of Chandrakat Patil; All three accused arrested : आरोपींनी निगडी येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरला फोन करून खंडणी मागितली होती.

एमपीसी न्यूज – ‘चंद्रकांत पाटील यांचा पी. ए बोलतोय’, असे म्हणत रुग्णालयाकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांना पोलिसांनी अटक केली आहे. विशाल अरूण शेंडगे (रा.कोंढवा), किरण धन्यकुमार शिंदे (रा.लोहियानगर) अशी अटक केलेल्या मुख्य सूत्रधारांची नाव आहे.

यापूर्वी पोलीसांनी याच गुन्ह्यांतील त्यांचा साथीदार सौरभ संतोष अष्टूळ (वय. 21, रा.लोहियानगर, गंजपेठ, पुणे) याला बुधवारी (दि.22) अटक केली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी निगडी येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टरला फोन करून ‘आम्ही चंद्रकात पाटील यांचे पी.ए बोलतोय’, असे सांगितले.

‘कोरोनाच्या महामारीमुळे गरीबांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब 28 लाख रूपयांची रक्कम आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन’, अशी धमकी दिली.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा प्रकार गंभीर असून आरोपीस पकडण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप विष्णोई यांनी विशेष सुचना देवून आरोपीच्या मोबाईलचे एस.डी.आर/सी.डी.आर टॉवर लोकेशनचा डाटा काढण्यास मार्गदर्शन केले व त्या प्रमाणे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 1 स्मिता पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला पकडण्यासाठी वेगवेगळ्या टिम तयार करण्यात आल्या होत्या.

तपासामध्ये या गुन्हयातील आरोपीच्या मोबाईलवर लक्ष केंद्रीत करून तपासास सुरूवात केली. परंतु, सदर गुन्हयातील आरोपीने आपला फोन बंद केल्यामुळे पोलिसांसमोर आरोपीस पकडण्याचे अव्हान निर्माण झाले होते.

या गुन्हयात आरोपीच्या मोबाईलचे सी.डी.आर काढले असता 30 जून पूर्वी सर्वात जास्त फोन आरोपीच्या फोनवर ज्याने फोन केले त्याचा शोध घेतला असता तो फोन येरवडा येथे राहणा-या मुलीकडे मिळाला.

या मुलीकडे गुन्ह्यातील आरोपी वापरत असलेल्या नंबरची चौकशी केली तर मुलीने सांगितले की, हा मोबाईल नंबर हा माझ्या वडिलांचा असून त्यांचे सिमकार्ड हे 29 जून रोजी चोरीला गेल्याचे सांगितले.

तसेच वडील येरवडा पोलीस ठाण्यासमोर नारळपाणी विक्री करतात असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित नारळपाणी विक्रेत्याकडे चौकशी केल्यावर सिम कार्ड चोरीला गेल्याचे त्याने सांगितले.

नारळपाणी विक्रेत्याची सगळी माहिती घेतल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी नारळपाणी विक्रेता नसून दुसरेच असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागली.

आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या नंबर वरून इतर कोणा कोणाला फोन लावला याचा अभ्यास करून संबधीत फोन धारकांना फोन करून संपर्क केला असता ते सर्व फोनधारक पुणे शहरातील असल्याचे व वेगवेगळे व्यापारी व व्यवसायिक असल्याचे समजले.

त्यातील 4 ते 5 व्यक्तींना फोन करून त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांना देखील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या फोन नंबरवरून फोन करून मी चंद्रकात दादा पाटील यांच्या कार्यालयातून बोलतोय, असे सांगत पैशाची मागणी केल्याचे समजले.

निगडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, किशोर पंढेर, सतीश ढोले, भूपेंद्र चौधरी यांनी पुणे येथील एका व्यापाऱ्याला आरोपीने पैसे मागितले होते त्यांची मदत घेऊन पैसे घेऊन जाण्यास बोलाविले.

आरोपीने पुण्यातील कौसर बाग येथे पैसे घेऊन बोलाविले. नंतर थोडया वेळयाने आरोपीने अंलकार चौक येथे बोलाविले. पोलीस व्यापारी म्हणून पैसे देण्यास गेले.

आरोपी पैसे घेण्यास येताच व्यापारी म्हणून गेलेल्या तपास पथकातील पोलीसांनी आरोपी सौरभ संतोष अष्टूळ ( वय.21, रा.लोहीयानगर गंजपेठ पुणे) याला अटक केली. त्याच्याकडील चौकशीत या गुन्ह्यात इतर दोन आरोपी असल्याचे निष्पण झाले.

त्यानुसार आरोपी विशाल अरुण शेंडगे (रा.कोंढवा) आणि किरण धन्यकुमार शिंदे (रा.लोहीयानगर) यांना पोलीस हवालदार किशोर पंढेर,पोलीस नाईक रमेश मावसकर, पोलीस शिपाई विजय बोडके, पोलीस शिपाई भूपेद्र चौधरी यांनी गुरुवारी (दि.23) रात्री पुणे शहरातून ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड‌ संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, महेंद्र आहेर, किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, विलास केकाण, सुनील जाधव,रमेश मावसकर,आत्मलिंग निंबाळकर, सोपान बोधवड, भूपेंद्र चौधरी, विनोद व्होनमाने, विजय बोडके, तुषार गेंगजे, राहुल मिसाळ,अमोल साळुंखे, दीपक जाधवर, तानाजी सोनवणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.