Chinchwad Crime News : मोक्काच्या गुन्ह्यात फरार आरोपीला सोलापुरातून बेड्या; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

एमपीसी न्यूज – मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सोलापूर येथून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 18) सायंकाळी करण्यात आली.

राजा सिद्राम माडेकर (वय 26, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील सुरज ऊर्फ ससा वाघमारे टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 16 जुलै रोजी मोक्काची कारवाई केली होती. त्या गुन्ह्यात आरोपी राजा माडेकर फरार होता. पोलीस नाईक आशिष बोटके आणि पोलीस हवालदार कानगुडे यांना माहिती मिळाली की, आरोपी राजा मोदीखाना सोलापूर येथे आहे. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने सोलापूर येथे जाऊन सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर पोलिसांच्या मदतीने चिंतलवार वस्ती, मोदीखाना सोलापूर येथून आरोपी राजा याला बुधवारी सायंकाळी सहा वाजता ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी चिंचवड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, आशिष बोटके, संदीप पाटील, प्रदीप गोडांबे, अशोक दुधावणे, किरण काटकर यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.