Chinchwad Crime News : मोबाईल हिसकावण्याचे आणखी तीन गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – पादचारी नागरिकांच्या हातातून मोबाईल फोन हिसकावून नेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाईल चोरट्यांनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मोबाईल फोन हिसकावण्याचे आणखी तीन प्रकार उघडकीस आले असून याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

समीर सतीश घाडगे (वय 29, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील सात हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला. ही घटना थरमॅक्स चौक, निगडी येथे सोमवारी (दि. 23) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली.

स्वप्निल महादेव उपरवट (वय 24, रा. सहयोगनगर, तळवडे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे 15 जूनला पहाटे पाचच्या सुमारास तळवडे येथील शरदनगर झोपडपट्टी समोरील बसथांब्यावर बसची वाट पाहत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादीच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.

सागर शिवाजी गंधाक्ते (वय 25, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे बुधवारी (दि. 25) रात्री सव्वादहाच्या सुमारास इंद्रायणीनगर येथे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या हातातील 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.