Chinchwad : पोलीस भरती प्रक्रियेत घोटाळा प्रकरणातील 90 आरोपींची यादी जाहीर

पिंपरी- चिंचवड पोलिसांकडून राज्यातील सर्व घटक प्रमुखांना अलर्ट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलाच्या विविध घटकांमध्ये पोलीस शिपाई आणि चालक पदांसाठी मैदानी आणि लेखी परीक्षा नुकतीच पार पडली. त्यानंतर पुढील प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पोलीस भरती परीक्षेत मोठा घोटाळा बाहेर काढला होता. त्यात सुमारे 90 जणांची नावे समोर आली होती. यात शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करणाऱ्यांची नावे समोर आली होती. त्यांच्याकडून या पोलीस भरतीत देखील अशा प्रकारे घोटाळे केले जाण्याची शक्यता लक्षात घेत पिंपरी-चिंचवड (Chinchwad) पोलिसांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना अलर्ट करत घोटाळ्यातील आरोपींची नावे जाहीर केली आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात सन 2019 च्या जाहिरातीनुसार सन 2021 मध्ये भरती करण्यात आली. करोनाच्या कालावधीत ही भरती प्रक्रिया काही महिने बारगळली होती. यावेळी पिंपरी-चिंचवड (Chinchwad) मध्ये राज्यातील सर्वाधिक जागा भरण्यात आल्या होत्या. त्यामुळे राज्यातील बहुतांश उमेदवारांचे लक्ष या भरतीकडे लागले होते. या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एक टोळी पकडली. स्पाय, ब्ल्यू टूथ, इयर बग यासह जुगाड तंत्रज्ञानाचा वापर उमेदवारांनी केला होता.

यामध्ये काही उमेदवार बोगस असल्याचे देखील उघडकीस आले होते. या बोगस उमेदवारांनी आतापर्यंत शासनाच्या वेगवेगळ्या 14 परीक्षा दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले. याच घोटाळ्यात सरकारी नोकरीत असणारे तलाठी, वनसंरक्षक, पोलीस शिपाई, लिपिक, आरोग्य सेवक यांचाही सहभाग असल्याचे आढळून आले होते. छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड जिल्ह्यातील सहा टोळ्या हे परीक्षा घोटाळे करीत असल्याने त्यांच्यावर याप्रकरणी पिंपरी-चिंचवड (Chinchwad) शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Monsoon Update : 20 ऑगस्टपासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे

या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सुमारे 90 पर्यंत गेली. यातील अनेकांना वेगवेगळ्या भागातून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली. सर्व गुन्हेगार पोलिसांनी रेकॉर्डवर आणले. नुकत्याच झालेल्या भरती प्रक्रियेत देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले आरोपी आणि त्यांचे साथीदार राज्यातील विविध घटकांमध्ये अशा प्रकारे घोटाळे करण्याची शंका पिंपरी- चिंचवड पोलिसांना आहे.

यावर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी- चिंचवड (Chinchwad) पोलिसांनी महासंचालक कार्यालयासह, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, राज्य राखीव पोलीस दलाचे सर्व समादेशक, लोहमार्ग विभागाचे सर्व अधीक्षक यांना आरोपींची माहिती कळवली आहे. तसेच, आरोपी उमेदवार पुन्हा भरती प्रकियेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवून ‘अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळे विविध घटकांमध्ये भरती प्रक्रियेत सहभागी झालेल्या उमेदवारांची पुन्हा चाळणी करून रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत का, याची पोलिसांकडून चाचपणी होण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.