Talegaon : स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून ती एक जबाबदारी आहे – प्रा. वसंत पवार

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्य सहजगत्या मिळालेलं नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नसून ती एक जबाबदारी आहे. याचे भान आपल्याला असलेच पाहिजे. याचा विचार करून, तीन तपांहून अधिक काळात मावळ शिक्षण प्रतिष्ठान संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आदर्श प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे देखील हे काम चालू राहील, अशी ग्वाही मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सहसचिव प्रा. वसंत पवार यांनी दिली.

मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित, आदर्श विद्या मंदिर संकुलात 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे सहसचिव प्रा. वसंत पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खजिनदार नंदकुमार शेलार, सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, शाळेचे माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक ओंकार भेगडे, पूर्व प्राथमिक विभाग संचालिका वैशाली इनामदार, प्राथमिक विभाग प्रमुख प्रतिज्ञा मांडे, माध्यमिक विभाग प्रमुख संतोष खामकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजय देवकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीहरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्या वीरांनी प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करून देशासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे.  तळेगावसाठी भूषणास्पद ठरेल असे यश मिळवणाऱ्या आणि पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेले ओंकार भेगडे हे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आजचा बालक हा उद्याचा जबाबदार नागरिक आहे. अशा जबाबदार आणि हुशार नागरिकांमुळे आपला देश प्रगतीपथावर राहील, असे मत नंदकुमार शेलार यांनी व्यक्त केले.

ओंकार भेगडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. विद्यार्थी दशेत केलेल्या कष्टांचे फळ आयुष्यभर मिळते. असे सांगून त्यांनी आदर्श विद्या मंदिरच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजास आणि पाहुण्यांना मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत, प्रतिज्ञा, संविधान, पंचप्रण शपथ घेतली आणि भारत माता की जयच्या जयघोषाने वातावरण दुमदुमले. यावेळी भेगडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गणेश दरेकर या पालकांचा शाळेला सरस्वतीची सुबक मूर्ती प्रदान केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल चिन्मयी लिमये, लवित पाटील, कृष्णा खेडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तन्वी जाधव, हर्षवर्धन पाटील, सिद्धी दाभाडे, समर्थ पवार, धनश्री शिंदे यांचा आठवीतील एन.एम.एम.एस. परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचा कला आणि वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेत इंग्लिश विषय घेऊन प्रथम आलेल्या सारा साळवी आणि वाणिज्य शाखेत प्रथम आलेल्या विनिता दानवले या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.

15 ऑगस्टला वाढदिवस असणाऱ्या स्वरा फाकटकर, शौर्या गदादे, वेदांत जगताप, ज्ञानेश्वर म्हस्के, हर्षदा गराडे, श्रावणी वाघमारे, समीक्षा सुरसे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदर्श विद्या मंदिरात ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियान राबवले गेले. तसेच हर घर तिरंगा, पोस्टर स्पर्धा, समूह गीत स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर पालक उपस्थित होते. प्रतीक्षा ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.