Chinchwad : पासपोर्ट पडताळणीमध्ये आढळले नाव साधर्म्य; साडेतीनशे जणांना सांगावे लागले, ‘तो मी नव्हेच…’

एमपीसी न्यूज – पासपोर्ट काढताना पोलिसांकडून (Chinchwad)चारित्र्य पडताळणी करून घेणे बंधनकारक आहे. अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्यास पासपोर्ट मिळत नाही. गुन्हेगारांच्या नावाशी अर्जदारांचे नाव साधर्म्य आढळल्यास पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते.

अशा वेळी अर्जदाराला ‘तो मी नव्हेच..’ असेच काहीसे पोलिसांना कागदोपत्री पटवून द्यावे लागते. ही वेळ पिंपरी-चिंचवड शहरातील साडेतीनशे जणांवर आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस (Chinchwad)आयुक्तालयांतर्गत 18 पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात पासपोर्ट पडताळणीसाठी स्वतंत्र विभाग आहे. या विभागातील कर्मचारी दररोज पडताळणीसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांचे माहिती संकलित करत असतात.

BJP : राजस्थान भाजपच्या विजयात भावेन पाठक यांचा मोलाचा वाटा!

अर्जदाराकडून आलेल्या अर्जानुसार पासपोर्ट पडताळणीसाठी 21 दिवसांचा कालावधी आहे. स्थानिक पोलीस ठाण्याकडून ही पडताळणी 15 दिवसात पूर्ण केली जाते. त्यानंतर उर्वरित दिवसात आयुक्तालय स्तरावरून पडताळणी करून अहवाल पासपोर्ट कार्यालयाला पाठवला जातो.

अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल अथवा गुन्हेगाराच्या नावाशी साधर्म्य असेल तर मात्र या पडताळणीसाठी वेळ लागतो. अर्जदार आणि गुन्हेगार यांच्या नावात साधर्म्य आढळल्यास संबंधित प्रकरण फेर पडताळणीसाठी स्थानिक पोलीस ठाण्यात पाठवले जाते. तिथे अर्जदार आणि अर्जदाराच्या नावाशी साधर्म्य असलेला गुन्हेगार यांच्यातील 32 प्रकारची माहिती पडताळून पाहिली जाते.

तसेच अर्जदाराला देखील काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनकडून अहवाल आयुक्तालयातील कार्यालयात पाठवला जातो. ही प्रक्रिया अतिशय वेळखाऊ असते.

नाव साधर्म्य आढळल्यास अर्जदाराची ससेहोलपट होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात चालू वर्षात ही ससेहोलपट साडेतीनशे अर्जदारांच्या वाट्याला आली आहे. त्या अर्जदारांना ‘तो मी नव्हेच…’ हे पोलिसांना सिद्ध करून दाखवावे लागले आहे.

शहरातून परदेशात शिक्षण, नोकरी आणि इतर कारणांसाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. मागील पाच वर्षात सर्वाधिक पासपोर्ट सन 2023 मध्ये घेण्यात आले.

अशी करा पोलीस पडताळणी
पोलीस पडताळणी करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. pcs.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन तिथे प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर लॉगिन करून अर्ज भरावा. अर्जामध्ये नाव, पत्ता आणि इतर माहिती द्यावी.

फी भरल्यानंतर अर्ज जमा करावा. अर्ज जमा झाल्यानंतर सुरुवातीला स्थानिक पोलीस कागदपत्रांची पडताळणी करतात. त्यानंतर अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी अर्ज पोलीस आयुक्तालयातील पडताळणी शाखेत येतो. तिथे पडताळणी झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज मंजूर होतो.

अर्जदाराच्या नावाशी जुळणारे एखाद्या गुन्हेगाराचे नाव आढळल्यास तसेच इतर त्रुटी राहिल्यास पडताळणी शाखेतून खातरजमा केली जाते. पडताळणी शाखेतून अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जदाराला पोलीस पडताळणी प्रमाणपत्र डाउनलोड करण्याबाबत संदेश प्राप्त होतो.

पोलीस पडताळणीसाठी आलेल्या अर्जांची संख्या
वर्ष अर्जांची संख्या
2019 67530
2020 32664
2021 45814
2022 65254
2023(सप्टेंबर पर्यंत) 68596

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.