Chinchwad News: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची टाटा मोटर्स कंपनीला भेट, इलेक्ट्रिक वाहनांची घेतली माहिती

एमपीसी न्यूज – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (बुधवारी) चिंचवड येथील टाटा मोटर्स कंपनीला भेट दिली. इलेक्ट्रिक वाहन प्रकियेची माहिती जाणून घेतली.

त्यांच्या समवेत पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर होते. मंत्री ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी, नवीन तंत्रज्ञानावराधारीत बस निर्मिती आदी माहिती घेतली.

वाहन निर्मितीबाबत समाधान व्यक्त करून ते म्हणाले, मुंबई, पुणे यासारख्या महानगरात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

लांब व जवळच्या पल्याचे अंतर लक्षात घेवून आसन क्षमतेची व्यवस्था करावी. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत आहे. पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल , असेही ते म्हणाले.

मंत्री ठाकरे यांच्या हस्ते कंपनी आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्य तांत्रिक अधिकारी राजेंद्र पेठकर, सुशांत नाईक, श्याम शिंह, आनंद कुलकर्णी, राजेश खत्री, अनिरुद्ध कुलकर्णी, वैजीनाथ गोंचीकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.