Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलिसांचे शहरात 24 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 7) शहरात कोंबिंग ऑपरेशन केले. तसेच 15 ठिकाणी नाकाबंदी करून रेकॉर्डवरील, फरार, तडीपार आरोपींना ‘चेक’ केले. या करवाईमध्ये 45 आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

शहरातील गुन्हेगारांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून विविध उपक्रम राबवले जातात. पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी रात्री शहरात तब्बल 24 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केले. तसेच 15 ठिकाणी नाकाबंदी केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी गँगस्टर, हिस्ट्रीशिटर, फरारी, तडीपार केलेल्या 255 आरोपींना ‘चेक’ केले. यातून 45 आरोपींना पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईसाठी ताब्यात घेतले. कारवाई दरम्यान तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात चाकण येथील कासव तस्करीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

पिंपळे निलखमध्ये असलेल्या नवयुग कालिकादेवी मंदिराचे कळस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सहा जुलै रोजी पहाटे तीन वाजता घडली. त्या घटनेतील मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या, तसेच खंडणी,जबरी चोरीने दाखल गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, तसेच सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 520 पोलिसांनी या कोंबिंगमध्ये सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.