Chinchwad : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचा पॅटर्न ठरला यशस्वी

प्रतिबंधात्मक कारवायांचा गुन्हेगारांना डोस

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी 14 डिसेंबर (Chinchwad) रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला. मागील एक वर्षाच्या कालावधीत आयुक्तालयाच्या हद्दीत प्रतिबंधात्मक कारवाया मोठ्या प्रमाणात झाल्या. त्याबाबत दाखल झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी मागील वर्षीच्या तुलनेत वाढली. तर याचा परिणाम गंभीर गुन्ह्यांच्या आकड्यांवर झाला. गुन्हेगारी टोळ्यांवर मोका, तडीपारी आणि अन्य प्रतिबंधात्मक कारवाया झाल्याने मागील वर्षभराच्या कालावधीत गंभीर गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याचे आकडे सांगतात.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी बसतील, असे आयुक्तालयाच्या निर्मितीच्या आदेशात म्हटले होते. सुरुवातीला आलेले दोन्ही आयुक्त आर के पद्मनाभन, संदीप बिष्णोई हे अपर पोलीस महासंचालक दर्जाचे होते. सप्टेंबर 2020 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी कृष्ण प्रकाश यांची आयुक्त म्हणून शहरात बदली झाली. त्यावेळी शहर आयुक्तांचे पदावतन करण्यात आले. त्यानंतर एप्रिल 2022 मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली. शासनाने पुन्हा पद उन्नत करून अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होईल, असे आदेश दिले.

त्यानुसार 13 डिसेंबर 2022 रोजी राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विनयकुमार चौबे यांची पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. चौबे यांनी 14 डिसेंबर रोजी आयुक्त पदाची सूत्रे माजी आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून स्वीकारली. आयुक्त पदाचा पदभार घेताच चौबे यांनी हिंजवडी इंडस्ट्रीयल असोसिएशन, चाकण इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि उद्योजकांच्या बैठका घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक इथल्या उद्योगांमुळे आहे. त्यामुळे इथल्या उद्योगांना सुरक्षित, पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी चौबे यांनी इंडस्ट्रीयल ग्रीवियंस सेल स्थापन केली. त्या माध्यमातून उद्योगांच्या अडचणी सोडविण्यात आल्या.

आयुक्तालयाला वाहनांची कमतरता होती. जिल्हा नियोजन समितीकडून वाहनांसाठी निधी मिळाला होता. मात्र शासकीय पातळीवर त्याला विलंब लागत असल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी त्याचा पाठपुरावा करत 21 नवीन चारचाकी वाहने मिळवली. त्याशिवाय (Chinchwad) आणखी वाहने आयुक्तालयाला मिळाली. आता शहर पोलीस दलात मुबलक वाहने आहेत. दरम्यान, पोलिसांनी वाहने रस्त्यावर, चौकांमध्ये लावण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. यातून दोन हेतू साध्य होतील. पहिला म्हणजे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वाहने पोलीस ठाण्यातून काढण्यासाठी वेळ लागणार नाही. आणि दुसरा हेतू म्हणजे पोलिसांची वाहने दिसल्याने त्यातून गुन्हेगारांवर जरब बसून शहरात सुरक्षित वातावरण निर्मिती होईल. यातून त्यांनी व्हिजिबल पोलिसिंग देखील त्यांनी सुरु केली.

बालगुन्हेगारी ही समाजाला लागलेली कीड आहे. ती मुळापासून नष्ट करायची असेल तर गुन्हेगारीकडे अनवधानाने वळालेल्या मुलांना केवळ शासन करून चालणार नाही. तर अशा मुलांना आणि त्यांच्या परिसरातील इतर होतकरू मुलांना एकत्र करून त्यांच्यात सांघिक भावना वाढीस लागायला हवी; यासाठी विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सुमारे 72 झोपडपट्ट्यांमधील मुलांच्या 36 फुटबॉल टीम तयार करण्यात आल्या. त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातून चांगले रोल मॉडेल निर्माण करण्याचा आयुक्त चौबे यांचा मानस आहे. दिशा उपक्रमाच्या माध्यमातून गुन्हेगारीकडे डोकावू पाहणाऱ्या मुलांच्या हाताला काम दिले जात आहे.

Cricket : कोहिनूर ग्रुप इलेव्हन आणि वॉरियर्स क्रिकेट अकॅडमी विजयी

गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मोका पॅटर्न जोमात राबवला. याचा परिपाक म्हणजे सुमारे 40 गुन्हेगारी टोळ्या सध्या तुरुंगात आहेत. जे भुरटेगिरी करतात, त्यांच्याही मुसक्या आवळल्या जात आहेत. कोंबिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेक करणे, नाकाबंदी आदींच्या माध्यमातून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना धाकात ठेवले जात आहे. पिस्टल आणि तत्सम घातक शस्त्रे वापरून गुन्हे घडू नये यासाठी आयुक्त चौबे यांनी पोलिसांमध्ये शस्त्र जप्त करण्याची स्पर्धा लावली. सर्व पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखांनी मरगळ झटकून त्यात सहभाग घेत शेकडो शस्त्रे जप्त केली.

पिंपरी चिंचवड शहरासाठी अपर पोलीस आयुक्त यांचे एक आणि उपायुक्तांची दोन पदे आयुक्त चौबे यांच्याच कार्यकाळात मंजूर झाली आहेत. दरम्यान अपर पोलीस आयुक्तांऐवजी पोलीस उपायुक्त दर्जाचे एक अधिकारी देण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. त्यास शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत अपर पोलीस आयुक्त हे पद अवनत करून एक पोलीस उपायुक्त शहराला दिले.

पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्त कार्यालयासाठी जागांचा शोध अंतिम टप्प्यात आहे. वाकड आणि मोशी येथील जागा मिळण्याच्या मार्गावर आहेत. वाकड येथे पोलीस आयुक्त कार्यालय आणि मोशी येथे इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची कार्यालये आणि पोलीस उपनिरीक्षक ते सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने बांधण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी देखील विनयकुमार चौबे यांनी मागील वर्षभरात शासन स्तरावर चांगला पाठपुरावा केला आहे.

14 डिसेंबर 2023 रोजी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना पिंपरी-चिंचवड शहरात एक वर्ष पूर्ण झाले. आतापर्यंत पिंपरी-चिंचवड शहराला पाच पोलीस आयुक्त लाभले. एकही आयुक्तांनी आजवर दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही. विनयकुमार चौबे यांचा एक वर्षाचा कालावधी दमदार राहिला. त्यामुळे ते पुढील वर्षभर राहतील, अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे. चौबे यांनी आणखी एक वर्षाचा कालावधी पूर्ण केला तर आयुक्तालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे ते शहरातील पहिले पोलीस आयुक्त ठरतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.