Chinchwad : सोलापूरच्या उपमहापौर महोदयांना सोडणे दोन पोलीस अधिकाऱ्यांना पडले महागात; एकाचे निलंबन, एक जण नियंत्रण कक्षाशी संलग्न

Releasing Solapur Deputy Mayor cost two police officers dearly; One suspended, one attached to the control room

एमपीसी न्यूज – फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या सोलापूरच्या उपमहापौर महोदयांना सोडणे सांगवी पोलिसांना चांगलंच महागात पडलं आहे. आयुक्तालयातील वरिष्ठांनी या प्रकरणात दोन अधिकारी प्रथमदर्शी दोषी आढळून आल्याने तपासी अधिकाऱ्याला निलंबित केले असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.

सोलापूर महापालिकेचे भाजपचे उपमहापौर राजेश दिलीप काळे यांना सांगवी पोलिसांनी एका फसवणुकीच्या गुन्ह्यात शुक्रवारी सोलापूर येथून अटक केली होती. या प्रकरणी नीता सुरेश लोटे, एका बँकेचे तत्कालीन बँक मॅनेजर यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सिंधू सुभाष चव्हाण यांनी फिर्याद दिलेली आहे.

आरोपींनी आपसात संगनमत करून सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक फ्लॅट अनेकांना विकून आर्थिक फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी सोलापुरात जाऊन विजापूर नाका पोलिसांच्या मदतीने उपमहापौर राजेश काळे यांना अटक केली.

उपमहापौर काळे यांना अटक केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अचानक शिंका आणि खोकला येत असल्याने पोलिसांनी नोटीस बजावत काळे यांना सोडून दिले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते.

खात्या अंतर्गत चौकशीत तपास अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे दोघेही दोषी आढळले. त्यामुळे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी सलग्न करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.