Chinchwad : जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र द्यावे; गजानन बाबर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

0

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणेला वारंवार रस्त्यावर पोलिसांकडून अडवले जाते. यामुळे जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र द्यावे, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष, माजी खासदार गजानन बाबर यांनी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे केली आहे.
गजानन बाबर यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशभर कोरोना साथीचा फैलाव होत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या 500 पेक्षा अधिक झाली असून महाराष्ट्र राज्यात ही संख्या 100च्या वर गेली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात पुढील 21 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात केवळ जीवनावश्यक वस्तू आणि सेवा यांचीच वाहतूक आणि रहदारी होणार आहे.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत असताना व्यापारी वर्गातील व जीवनावश्यक वितरकांच्या कामगार, डिलिव्हरी बॉईज वितरण करण्याकरीता जात असताना पिंपरी-चिंचवड शहरातील पोलीस रस्त्यावर अडवतात. त्यामुळे किराणा व्यापारी, मेडिकल, गॅस वितरक व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करताना वितरकांना तसेच व्यापा-यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तसेच घरपोच डिलिव्हरी करण्यासाठीही अडचणी निर्माण होत आहेत.
लोकांना घरपोच डिलिव्हरी मिळत नसल्याने दुकानाबाहेर, मेडिकल बाहेर व गॅस वितरकांच्या बाहेर नागरिक रांगा लावत आहेत. यातून गर्दीचे प्रमाण वाढत असून कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना जीवनावश्यक सेवा व वस्तू मिळण्यासाठी वितरण प्रणालीत काम करणाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष गजानन बाबर, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, भोसरी विभाग प्रमुख श्याम शेठ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
HB_POST_END_FTR-A2
You might also like