Chinchwad : चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार , पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून विभागीय आयुक्तांना अहवाल सादर
एमपीसी न्यूज – चाकण औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर (Chinchwad )आला आहे. देशात नावलौकिक असलेल्या एमआयडीसीला वाहतूक कोंडी आणि इतर मुलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी लक्ष घातले. त्यानंतर पोलीस, इंडस्ट्रीयल फेडरेशन, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण अशा सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले आहे. एकत्रित प्रयत्नांमधून हा प्रश्न सोडविण्यावर आता भर दिला जाणार आहे.
चाकण परिसरात होणारी वाहतूक कोंडी नित्याची झाली असून त्याची(Chinchwad ) इथल्या नागरिकांनी सवय करून घेतली आहे. मात्र उद्योगांना याचा चांगलंच फटका बसत आहे. त्यामुळे इंडस्ट्रीयल असोसिएशनकडून याबाबत विभागीय आयुक्तांना साकडे घालण्यात आले. विभागीय आयुक्तांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराचा पाहणी दौरा करून अहवाल सदर करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी चाकण येथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची माहिती विभागीय आयुक्तांकडे सदर केली आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, “विभागीय आयुक्तांच्य निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने चाकण मधील परिस्थितीचा आढावा घेतला. तिथे कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सदर करण्यात आला आहे. चाकण परिसरात आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला जात आहे.”
विभागीय आयुक्तांकडे सदर करण्यात आलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे –
पुणे नाशिक महामार्गावरील बंगला चौक मोठा करून डांबरीकरण करणे. कारण या ठिकाणी लांब व मल्टी एक्सेल वाहनांना टर्निंगसाठी अडचणी येतात, त्या दूर होतील.
तळेगाव चौक येथे पादचाऱ्यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पुल तयार करणे.
तळेगाव चौकातील नाशिककडे जाणाऱ्या बसचा बस थांबा 100 मीटर पुढे नेणे.
तळेगाव चौकातील पुण्याकडे जाणाऱ्या बसचा बस थांबा 100 मीटर पुढे नेने.
तळेगाव चौकातील पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या बस थांब्याजवळ साठलेले पाणी काढून टाकण्यासाठी नाणेकर ग्रामपंचायत ड्रेनेज तयार करून ते पाणी काढून देतील.
तळेगाव चौकातील पुण्याहून महाळुंगेकडे वळणाऱ्या कॉर्नरवर असलेला ट्रांसफार्मर काढून त्या ठिकाणी अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल टाकणे. हा चौक मोठा करून डांबरीकरण करणे.
तळेगाव चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळणाऱ्या चौकात कॉर्नरवर असलेले आरसीसी ड्रेनेजचे ओपनिंग काढून ते रस्त्याच्या लेव्हलला समतल तयार करणे व या ठिकाणी डांबरीकरण करून हा कॉर्नर मोठा करणे.
पुणे नाशिक रोडवरील मुटकेवाडी चौक ते आंबेठाण चौक रोडवरील सर्विस रोडचे डिव्हायडर काढणे व सदर ठिकाणी डांबरीकरण करणे.
आंबेठाण चौक मोठा करून डांबरीकरण करणे.
आंबेठाण चौकातील तिन्ही कॉर्नरला टर्निंग कॉर्नरवर असलेले इलेक्ट्रिक पोल काढून टाकणे व या इलेक्ट्रिक वायर अंडरग्राउंड करणे व सदर ठिकाणी डांबरीकरण करणे व हा चौक मोठा करणे.
आंबेठाण चौकातील पुण्याकडून आंबेठाणकडे वळणाऱ्या कॉर्नरवर असलेला नाला बंदिस्त करून त्या ठिकाणी समतल आरसीसी बांधकाम करून चौकाचे रुंदीकरण करणे.
आंबेठाण चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळताना असणाऱ्या कॉर्नरवरील इलेक्ट्रिक पोल काढून इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राउंड करणे व त्या ठिकाणी चौकाचे रुंदीकरण करणे.
आंबेठाण चौकातील चाकण गावातून पुण्याकडे वळताना असणाऱ्या कॉर्नरवरील नाला बंदिस्त करून त्यावर आरसीसी बांधकाम करून समतल करणे व रस्ता रुंदीकरण करणे.
आंबेठाण चौक येथे पादचाऱ्यांसाठी रस्ता क्रॉस करण्यासाठी पादचारी पूल उभारणे.
तळेगाव चौकात असलेला मजूर अड्डा चाकण मार्केट जवळील पीडब्ल्यूडीच्या जागेत स्थलांतरित करणे.