Nigdi News: नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या ‘महावितरण अधिकारी झोडगे हटाव, यमुनानगर बचाव’ला नागरिकांचा प्रतिसाद

एमपीसी न्यूज – महावितरणचे अभियंता संतोष झोडगे यांनी अतिशय निकृष्ट व अकार्यक्षम काम केले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी यासाठी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 13 मध्ये “महावितरण अधिकारी झोडगे हटाव, यमुनानगर बचाव” मोहीम राबवली. याला प्रतिसाद देत प्रभागातील नागरिक ठाकरे मैदानावर सकाळी मोठ्या प्रमाणात एकत्र झाले होते. येत्या 15 दिवसात वीज पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला नाही. तर, महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा नगरसेवक केंदळे यांनी दिला.

आमदार महेश लांडगे यांनी निगडीत भेट दिली. त्यांच्या समोर नागरिकांनी वीजपुरवठा संदर्भातील तक्रारींचा पाऊस पाडला. गेली तीन दिवस झाले नगरसेवक केंदळे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. यामध्ये अनेक राजकिय पदाधिकारी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

त्यावर आमदार महेश लांडगे अधिकाऱ्यांना इशारा देत म्हणाले की, आपण नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याची वाट बघू नका. नागरिक तुम्हाला मोफत वीज मागत नाही. आपण जनतेचे सेवक आहात. सर्व्हिस केबल टाकून वीजपुरवठा सुरळीत करा. लोकांना उडवाउडवीची उत्तरे देउन वेडे बनवू नका. झोडगे यांनी केंदळे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेत पोलीस स्टेशन मध्ये लोकप्रतिनिधींची तक्रार करत असाल तर नागरिकांचेही पर्याय तुम्हाला येणाऱ्या काळात दिसतील अशी तंबी लांडगे यांनी दिली.

प्रभाग क्रमांक 13 मध्ये वीज पुरवठ्याचा प्रश्न नेहमीचाच झाला आहे. कोरोना काळातही नेहमीच विजेचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी अधिकाऱ्यांच्या विरोधात केंदळे यांच्या वतीने मोहीम राबवली. गेली तीन वर्ष वीज पुरवठा संदर्भात अधिकार्‍यांशी व प्रशासनाशी लढतो आहे त्यामुळे यात कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा सूचक इशारा केंदळे यांनी विरोधकांना दिला.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत. त्यांना ऑनलाईन अभ्यास करावा लागतो. शाळेच्या ऑनलाईन शिक्षणासाठी, काम व व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी लाईटची गरज आहे. प्रभागातील नागरिक रात्री-अपरात्री फोन करून लाईट संदर्भात मला विचारणा करतात. महावितरणमधील पूर्वीचे अधिकारी चांगले काम करायचे. आत्ताचे अधिकारी संतोष झोडगे निष्कृष्ट दर्जाचे काम करत आहेत. लाईट संदर्भातील तक्रार त्यांच्याकडे नागरिक घेऊन गेले असता त्यांना अर्वाच्च उद्धट भाषेत ते बोलतात. ही बाब अतिशय निंदनीय आहे. नागरिकांच्या लाईट संदर्भात विचारणा केली असता लोकप्रतिनिधीला अरेरावीची भाषा करणे एका अधिकाऱ्याला शोभते का? असा सवाल करत महावितरण अधिकारी यांनी सांगितल्या प्रमाणे पंधरा दिवसात विजेचा प्रश्न निकाली निघाला नाही. तर, महावितरणच्या विरोधात मोर्चा काढून त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल असा इशारा नगरसेवक केंदळे यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.