Pimpri News : जनसंवाद सभेतील तक्रारींवरील कार्यवाहीची माहिती नागरिकांना मिळणार

एमपीसी न्यूज – जनसंवाद सभेत आज (सोमवारी) 113 नागरिकांनी अधिका-यांशी संवाद साधून आपल्या सूचना मांडल्या. या सभेद्वारे निर्णयाच्या अंमलबजावणीची कालमर्यादा आणि वेग याबद्दल नागरिकांनी महापालिका यंत्रणेविषयी समाधान व्यक्त केले. जनसंवाद सभेत दाखल झालेल्या सूचनांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधितांना देण्याची व्यवस्था करावी, असे आदेश जनसंवाद सभेच्या मुख्य समन्वय अधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि जितेंद्र वाघ यांच्या नियंत्रणाखाली आज महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये सुमारे 113 नागरिकांनी तक्रारी आणि सूचना मांडल्या. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे 11, 17, 5, 15, 9, 7, 26, आणि 23 नागरिकांनी जनसंवाद सभेत उपस्थित राहून आपले म्हणणे मांडले.

अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.

आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

जनसंवाद सभेमध्ये विविध सूचना मांडण्यात आल्या. यामध्ये ड्रेनेज लाईन टाकणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, करसंकलन कार्यालयात पाणीबील भरण्याची व्यवस्था करणे, पाणी पुरवठा सुरळीत करणे, पदपदापथावरील पार्किंग हटविणे, भटक्या कुत्र्यांबाबत व्यवस्था करणे, रस्त्यांमधील चेंबर्सची उंची रस्त्याच्या समतल करणे, धोकादायक वृक्षांची छाटणी करणे, औषध फवारणी करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे, खराब झालेले पेव्हींग ब्लॉक बदलणे, पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढणे आदींचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.