Pimpri News : शहरवासीयांनो काळजी घ्या! डेंग्यूचे रूग्ण वाढतायेत!

 एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जुलैतील अवघ्या 14 दिवसांमध्ये डेंग्यूचे 256 संशयित, तर 16 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घराच्या, कार्यालयाच्या परिसरात पाणी साठणार नाही, याची काळजी घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या (Pimpri News) वैद्यकीय विभागाने केले आहे.

 

जून महिन्यात डेंग्यूचे 297 संशयित तर, 17 बाधित रुग्ण आढळले होते. जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यात 1 हजार 982 रूग्ण तापाचे आढळून आले आहेत. यामध्ये डेंग्यूचे 256 संशयित तर 16 बाधित रुग्ण आढळले आहेत. चिकनगुनियाचे तीन संशयित रूग्ण आढळले आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण असते. डासांमुळे हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरतात. हिवताप हा आजार पसरविण्यास अनॉफिलस डास तर, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात.

 

 

हिवताप, डेंग्यू किंवा चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागतो. एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासाची मादी स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. त्यातून 2 दिवसांनी डास बाहेर पडतात.

डेंग्यू, चिकुनगुनियाची लक्षणे
तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, त्वचेखाली, नाकातून रक्तस्राव होणे व रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रीत, काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे आदी. तर, चिकुनगुनियाच्या लक्षणांमध्ये (Pimpri News) कमी मुदतीचा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ आढळून येणे आदी. वरील सर्व लक्षणे 7 ते 10 दिवसांसाठी असतात. हिवतापाची लक्षणे : थंडी वाजून ताप येणे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते. डोके दुखते. बऱ्याच वेळा उलट्या होतात.

 

Indian Railway : व्हिस्टाडोमसह प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु

 

अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, ”नागरिकांनी पाणी साठविण्याच्या भांड्यातील पाणी वापरून रिकामी करून घासून पुसून कोरडी करावी. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घरातील ज्या मोठ्या पाण्याच्या टाक्‍या रिकाम्या करता येणार नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवरपॉट, कुलर, फ्रिजखालील ट्रेमधील  (Pimpri News) पाणी चार ते पाच दिवसांनी रिकामे करावे. घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा संबंधित ठिकाणी पाणी वाहते केले जाईल, याची दक्षता घ्यावी”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.