Pune : वीजसुरक्षेसाठी महावितरणकडून तब्बल 39 लाख ग्राहकांशी संवाद

पुणे परिमंडलात ‘वीजसुरक्षा संवाद अभियान’मध्ये विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – वीजसुरक्षेच्या प्रबोधनासाठी पुणे परिमंडल अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात ‘वीजसुरक्षा संवाद अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानात विद्यार्थी व नागरिकांसोबत थेट संवादासह विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत महावितरणने राज्यातील 39 लाख 21 हजार ग्राहकांना वीजसुरक्षेच्या माहितीचे ई-मेल पाठवले आहेत.

Chinchwad : चांद्रयान तीनच्या यशाचे चिमुकल्यांनी केले सेलिब्रेशन

पुणे (Pune) परिमंडलामध्ये 26 जून ते 2 जुलैपर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ‘वीजसुरक्षा संवाद अभियान’ सातत्याने सुरु ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले. 3 जुलैपासून सुरु झालेल्या या अभियानात कार्यालयीन कामाची जबाबदारी सांभाळून 12 विभागांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता (प्रशासन व सुरक्षा), 41 सहायक अभियंता (गुणवत्ता नियंत्रण) तसेच 20 प्रशिक्षणार्थींना वीजसुरक्षेच्या प्रबोधनाची जबाबदारी देण्यात आली आहे. या अभियानाचे समन्वयक म्हणून उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी काम पाहत आहे.

वीजसुरक्षेबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी नोंदणीकृत ग्राहकांना ई-मेल पाठविण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी मुख्यालयास सादर केला होता. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि संचालक (मानव संसाधन) अरविंद भादिकर यांनी हा प्रस्ताव तात्काळ मंजूर केला.

त्यानुसार वीजसुरक्षेबाबत सजग करणारे ई-मेलस् राज्यातील 39 लाख 21 हजार 921 वीजग्राहकांना महावितरणकडून पाठविण्यात आले. यामध्ये पुणे प्रादेशिक विभाग- 13 लाख 95 हजार 427, कोकण प्रादेशिक विभाग- 17 लाख 10 हजार 372, नागपूर प्रादेशिक विभाग- 5 लाख 95 हजार 503 आणि छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागातील 3 लाख 6 हजार 19 वीजग्राहकांचा समावेश आहे.

पुणे परिमंडलात सुरु असलेल्या ‘वीजसुरक्षा संवाद अभियान’त आतापर्यंत 43 शाळा/महाविद्यालयांमध्ये सुमारे 21 हजार विद्यार्थ्यांना वीजसुरक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे. रेल्वे व बसस्थानके, धार्मिक स्थळ, उद्याने, आठवडे बाजार व इतर गर्दीचे ठिकाणी तसेच दाट लोकवस्ती व पत्र्यांच्या घऱांच्या वसाहती, इतर सोसायट्या आदी ठिकाणी सुमारे 20 हजार नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला आहे.

माहिती पत्रकांचे देखील वाटप करण्यात येत आहे. यासोबत महावितरणच्या 750 अभियंते, तंत्रज्ञ तसेच बाह्यस्त्रोत तांत्रिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. वीजसुरक्षेच्या ‘ऑनलाइन प्रश्नमंजूषा’ उपक्रमात आतापर्यंत 1500 नागरिकांनी सहभाग घेतला असून यशस्वी उत्तरदात्यांना ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

पुणे (Pune) परिमंडलचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले, ‘वीजसुरक्षेचा जागर हा सीमित कालावधीसाठी नव्हे तर सातत्याने राबविण्याचा निर्धार आहे. वीजयंत्रणेमध्ये अजाणतेपणे केलेली चूक जीवावर बेतू शकते. एका व्यक्तीचा मृत्यू म्हणजे तीन पिढ्यांचे नुकसान आहे. त्यामुळे शून्य विद्युत अपघातासाठी ‘वीजसुरक्षा संवाद अभियान’ सुरु करण्यात आले आहे.’

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.