Pimpri News : टपरी, पथारी, हातगाडी धारकांच्या न्याय हक्कासाठी संपर्क अभियान : बाबा कांबळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार असून या निमित्ताने प्रत्येक पक्षाच्या वतीने संपर्क अभियान राबवून जुळवाजुळव केली जात आहे. आपल्या पक्षाचे प्रतिनिधी महापालिकेत कसे जातील, यासाठी राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. यामध्ये कष्टकऱ्यांचा कोणताही विचार केला जात नाही. त्यामुळे टपरी, पथारी, हातगाडी धारक कष्टकरी जनतेनेही संपर्क अभियान सुरू केले आहे. शहरातील टपरी, पथारी, हातगाडी धारक यांच्याशी संपर्क करून त्यांना त्यांचे हक्क अधिकार न्याय मिळवून देण्यासाठी संपर्क सुरू केले असल्याचे प्रतिपादन टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

एच ए कॉर्नर, व संत तुकाराम नगर येथे नुकतीच टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीची बैठक घेण्यात आली. टपरी, पथारी, हातगाडी पंचायतीचे कार्याध्यक्ष बळीराम काकडे, शहराध्यक्ष रमेश शिंदे,उपाध्यक्ष प्रकाश यशवंते यांनी अभियानाचे मुख्य आयोजन केले. शहरातील प्रत्येक भागात जाऊन हे संपर्क अभियान राबवले जाणार आहे.

बाबा कांबळे म्हणाले की, शहरातील प्रत्येक टपरी, पथारी, हातगाडी धारकांकडे जाऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले जात आहे. कोविड नंतर कर्जाची उपलब्धता कसे करता येईल, परवाना कसा देता येईल, जागा उपलब्ध करणे व कर्ज निर्माण करणे याबाबत चर्चा करण्यात येत आहे. महापालिकेमध्ये 2005 साली मोठे आंदोलन करण्यात आले होते.

त्यानंतर सलग दोन वर्ष हे आंदोलन करण्यात आले. 2007 मध्ये दिलीप बंड यांनी महानगरपालिका धोरण 2007 हा देशातील पहिला कायदा मंजूर केला. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष केला यामुळेच हा कायदा झाला याचं श्रेय आमच्या संघटनेला आहे. या घटनेला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र प्रशासनाच्या उदासीन मानसिकतेमुळे प्रत्यक्ष त्याची अंलबजावणी होताना दिसत नाही. प्रस्थापित राजकीय पक्ष व नगरसेवक यांनी योग्य भूमिका न घेतल्यामुळे कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत.

यासाठी शहरात योग्य ठिकाणी हॉकर्स झोनची निर्मिती व्हावी, जागा कुठे उपलब्ध आहेत या सर्व प्रश्नांवर संपर्क अभियानामध्ये चर्चा केली जात आहे. यासह टपरी, पथारी आणि हातगाडीधारकांवर वारंवार होणारी अतिक्रमण कारवाई थांबली पाहिजे ही मुख्य मागणी बैठकीत ठरत आहे. आम्हाला ही सन्मानाने जगता आले पाहिजे, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात येत आहे. या संपर्क अभियानाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे, त्यांना त्यांचे न्याय्य हक्क अधिकार मिळवून देणे हा मुख्य भाग असल्याचे कांबळे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.