Corona Third Wave : पालकांनी घाबरु नये, मात्र मुलांची काळजी घ्या ; तिस-या लाटेसाठी बालरोगतज्ज्ञाचा सल्ला

एमपीसीन्यूज : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात दुस-या लाटेत मेपर्यंत 8000 पेक्षा जास्त मुलांना करोनाची लागण झाली. जवळपास सर्वच ठिकाणी हीच परिस्थिती आहे. हा अहवाल अगदी चिंताजनक आहे. कोविड -19 विषाणूची परिस्थिती सतत बदलत आहे. आगामी काळात विषाणूचे वर्तन कसे होईल, याविषयी या क्षणी अंदाज करणे कठीण आहे. त्यामुळेच पालकांनी घाबरु नये, मात्र मुलांची आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, असे मत कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे बालरोगतज्ञ डॉ. गणेश बडगे यांनी व्यक्त केले आहे.

सर्वसाधारणपणे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्‍या लाटेत जास्त मुलांना संसर्ग झाला आहे. तथापि, बहुतेक मुलांना सौम्य ते मध्यम लक्षणे आढळली आहेत. त्यामुळे त्यांना क्वचितच हॉस्पिटलमध्ये भरती करणे आवश्यक होते. मुलांशी संबंधित कोणतीही आणीबाणी हाताळण्यास आम्ही सज्ज आहोत. मुलांच्या औषधांची यादी, मुलांच्या आकाराची साधने व बालरोग परिचारिका शोधून तयार ठेवणे गरजेचे आहे.

या संदर्भात डॉ. गणेश बडगे म्हणाले की, लसीकरणाच्या अधिक चांगल्या व्याप्तीमुळे मुलांना विषाणूंपासून वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली जाईल. लसीकरणाचा दर सुधारण्याच्या दिशेने सर्व प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. कोव्हिड-19 संबंधित अनुभव लक्षात घेता दोन्ही डोस घेण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. मुलांसाठी तर त्यापेक्षा अधिक कालावधी लागू शकतो. त्यामुळेच मुलांविषयी अधिक लक्षपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.

मुलांमध्ये कोविडच्या तिस-या लाटेत प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करणे महत्वपूर्ण आहे. मुलांच्या पालकांचे किंवा निकटवर्तियांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास लक्षणे नसलेली मुले असल्यास देखील अर्भक, नवजात आणि मुलं यांची आरटीपीसीआर चाचणी करा. कारण ते आजाराचा प्रसार करणारे असल्यामुळे त्यांचा खोकला, शिंकणे व रडण्याने कुटुंबात व्हायरस पसरवू शकतात. इतर संक्रमण टाळण्यासाठी नियमित लसीकरण विशेषत: फ्लूचे शॉट्स पूर्ण करा आणि इतर प्रतिबंधित आजारांकरिता रुग्णालयात भेट द्या.

संतुलित आहार आणि भरपूर द्रवपदार्थ यांचे बाळाला चांगले पोषण द्या. मुलांमध्ये लठ्ठपणा टाळा आणि प्रतिबंधित करा. कारण ते गंभीर कोविड संसर्गासाठी जोखीम घटक म्हणून कार्य करते. कुटूंबाच्या कोणत्याही सदस्याला लक्षणे असल्यास, बाळांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी विलगीकरण करावे.

शक्य तितके लवकर कोविडसाठी कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण लसीकरण करा. लहान मुलांना खेळण्यात, वाचण्यात आणि घरातील कामाच्या योगदानामध्ये गुंतवून ठेवा, असाही सल्ला बालरोगतज्ञ डॉ. गणेश बडगे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.